मुंबई - राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. त्यांनी बैठक घेऊनही महायुतीच्या जागा वाटपातील तिढा सुटला नाही. चर्चेनंतर अंतिम तोडगा निघाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे यांना २२ तर अजित पवारांना हव्यात १० जागा- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्री अकोला, जळगाव दौऱ्यावरून रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली. परंतु या बैठकीनंतर सुद्धा महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असल्याची चर्चा आहे. याचे कारण शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी ( अजित पवार गट) यांना हव्या असलेल्या जागा संदर्भात अद्याप महायुतीत मतभेद आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना हव्या असलेल्या जागांची यादी यापूर्वीच भाजपाकडं सोपवली होती. परंतु, ही यादी अजूनही निश्चित झाली नसल्यानं मंगळवारी रात्रीसुद्धा त्या जागा संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
विद्यमान खासदार असलेल्या पक्षांना मिळणार जागा - २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यंदा त्याच २२ जागा हव्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किमान १० जागांची अपेक्षा आहे. अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत लोकसभेच्या १७ जागांचा आढावा घेतला आहे. ज्या पक्षाचे विद्यामान खासदार आहेत, त्या जागा त्याच पक्षांकडे राहतील, असे सर्वसाधारण सूत्र ठरलं आहे. तसे असल्यास भाजपाकडं २३, एकनाथ शिंदे यांच्याकडे आताच्या घडीला १३ तर अजित पवार यांच्याकडे रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागा भाजप, शिंदे आणि अजित पवार गट यापैकी कोणी व कुठल्या लढवायच्या यावरून सध्या महायुतीत वाद सुरू आहे.
जागा वाटपाचा तिढा कायम- अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सह्याद्रीवरील चर्चेत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता होती. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा व शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गटाला हवे असलेल्या जागा यावर बरीच खलबत्ते झाली. भाजपाकडूनसुद्धा अनेक जागांवर दावा करण्यात आल्या असल्याकारणानं रात्रीची चर्चा निष्फळ ठरली आहे. भाजपानं त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. याचं कारण हेच आहे की, जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना पुन्हा एकदा बसून याबाबत सविस्तर चर्चा करण्याची सूचना केली. संसदीय मंडळाची गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
- अमित शाह हे आज बुधवारी दुपारपर्यंत मुंबईत आहेत. ते सकाळी अकरा वाजता ते वांद्रे-कुर्ला संकुलामधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इंडियन ग्लोबल फोरमच्या वार्षिक संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा-