छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve Vs Chandrakant Khaire : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये अंतर्गत सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेला वादाचं स्वरुप प्राप्त झाल्यानं या दोन्ही नेत्यांना तातडीनं मातोश्रीवर बोलवण्यात आलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः दोघांमध्ये मनधरणी करुन उमेदवार जाहीर करतील, असं बोललं जातंय. त्यामुळं या दोघांची दिलजमाई उद्धव ठाकरे कशी करणार, असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय.
उमेदवारी मिळवण्याची इच्छा : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आग्रही आहेत. मात्र, चार वेळेस खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांची दावेदारी जवळपास निश्चित मानली जातेय. गेल्या दहा वर्षापासून लोकसभेचं तिकीट मिळावं, याकरिता अंबादास दानवे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडं मागणी केलीय. नवीन चेहरा दिल्यास विजय निश्चित होईल, असं मत अंबादास दानवे यांनी पक्षाकडे व्यक्त केलं. मात्र पक्षानं पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलंय. त्याप्रमाणे खैरे कामाला लागले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा निराशा पदरी पडल्यानं दानवे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी मला नेहमीच डावललं जातं असा आरोप दानवे यांनी खैरेंवर केलाय त्यामुळं ऐन लोकसभा निवडणूक काळात दोन नेत्यांमधील बेबनाव पक्षाच्या कामावर परिणामकारक ठरेल, अशी शक्यता निर्माण झालीय.
मातोश्री वर बोलणी : शनिवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात असा आरोप केला. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी असं केलं असतं तर तुम्ही विरोधी पक्षनेते झाले नसते, असा पलटवार केला. आपल्याच कुटुंबातील सदस्य आहे. हे नवीन नाही असं देखील खैरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही तातडीनं मातोश्रीवर बोलावलंय. त्यामुळं रविवारी सकाळी पहिल्या विमानाने दोन्ही नेते एकाच विमानात मुंबईकडे रवाना झालेत. आता मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमधील वाद मिटणार का? लोकसभेचे तिकीट नेमकं कोणाच्या पदरी पडेल, याकडं शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा :