छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : 'शिंदे गटाकडून मला रोजच फोन येतात. मी नाकारत नाही. काही जणांना वाटत मी त्यांच्यासोबत राहावं. पण माझ्याकडून होकार देणार नाही,' असा गौप्यस्फोट राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. "ते माझे जुने सहकारी आहेत. त्यामुळं त्यांचा फोन आल्यावर त्यांच्याशी बोलणं काही गैर नाही. मात्र मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे. मी गद्दार बोलायचं आणि तिकडं जायचं हे मनाला पटणारं नाही. शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार पुष्कळ आहेत. मी देखील माझी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षानं पूर्ण अभ्यास करुन निर्णय घेतलाय. पक्षाचा हित महत्त्वाचं आहे. मला राज्यात दिलेली जबाबदारी मी नक्की पार पाडेल, असंदेखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
चारशे पार म्हणणाऱ्यांना तडीपार करणार : पुढे दानवे म्हणाले, " लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्ष मागील वर्षभरापासून तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिलेली उमेदवारी पूर्ण विचार करुन, पक्षातील नेत्यांना आणि मतदारांना लक्षात घेऊन दिलीय. दिल्ली गाठण्यासाठी ही यादी प्रभावी असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे सर्व दिल्लीत पोहोचतील. चारशे पार म्हणणाऱ्यांना तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही," असा निर्धार केल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय.
पक्षहिताला जास्त महत्त्व - "2014 पासून मी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडं इच्छा व्यक्त केलीय. मात्र त्यात काही चूक नाही. मला उमेदवारी जरी मिळाली नसली तरी राज्यात मला मोठी जबाबदारी आतापर्यंत मिळालीय. विधानपरिषदेचा आमदार आणि विरोधीपक्ष नेता ही मोठी पदं मला मिळाली आहेत. मी महाराष्ट्रात काम करतो. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल. मला पक्षाचा हित कळतं. वैयक्तिक हितापेक्षा मी पक्षहिताला जास्त महत्त्व देतो. पक्ष पुढं गेला तर मीदेखील पुढं जाईल. त्यामुळं राज्यात लोकसभा निवडणुकीत पूर्ण प्रयत्न करणार आहे,"अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय
देशात सत्ता आणि संपत्तीचा गैरवापर : पुढं बोलताना दानवे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत काही आव्हानं आहेत. विशेषतः सत्ता आणि संपत्तीचा होणारा गैरवापर हे मोठं आव्हान आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. भाजपादेखील धुतल्या तांदळाचं नाही. तुमच्या खात्यात 6000 कोटी कसे आले? ईडी, सीबीआय यांचा धाक दाखवून हे तुम्ही घेतले आहेत. देशात जो बाजार मांडलाय, ते मोठं आव्हान आहे. मात्र इतिहासात साक्ष आहे की सामान्य व्यक्तीच जिंकत असतो. विजय हा लोकशाहीचाच होईल."
हेही वाचा :