श्रीरामपूर Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी 200 पेक्षा अधिक लोकांचे प्रश्न तातडीनं सोडविल्याचा दावा केला आहे. जनता दरबारानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शासन आपल्या दारी भंपक कल्पना : "राज्य सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवतंय. मात्र श्रीरामपूरातील एक व्यक्ती 28 वर्षांपासून शासन दरबारी चकरा मारतोय. मग शासन कोणाच्या दारी जातंय. शासन आपल्या दारी ही भंपक कल्पना आहे", अशी टीका दानवेंनी केली. "शासन आपल्या दारी कार्यक्रमात सरकारनं कोणतेही दिवे लावले नाहीत. दिव्या खाली मोठा अंधार आहे", असा हल्लाबोल अंबादास दानवेंनी केला.
शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही : दुधाला राज्य सरकारनं 34 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं. मात्र आज कुठलाही खाजगी किंवा सरकारी दूधसंघ शेतकऱ्याच्या दुधाला 34 रूपये भाव देत नाही. आज दुधाला 22 ते 25 रुपये भाव दिला मिळतोय. सरकारनं 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं. तेही शेतकऱ्यांना दिलं जात नाही. निवडणुका डोळ्यासमोर आल्यावर सरकार या सर्व घोषणा करत असल्याची टीका दानवेंनी यावेळी केली.
..तर भुजबळांनी राजीनामा द्यावा : "मंत्री मंडळाचा निर्णय ही सामुदायिक जबाबदारी असते. तो भुजबळ पाळताना दिसत नाहीत. ते फार स्वाभिमानी असतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा. नाही तर मंत्री मंडळाचा जो काही निर्णय आहे, तो भुजबळ यांनी मान्य केला पाहीजे. भुजबळ मुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या पक्षालाच आवाहन देतायेत का? भुजबळांची भूमिका एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का?", असा थेट सवाल दानवेंनी उपस्थित केला.
भाजपाचे लोक दादागिरी करतात : "देशात सर्वात जास्त दंगली महाराष्ट्रात झाल्या. दंगली घडवण्यात आणि जातीवाद निर्माण करण्यात भाजपाचा हात आहे. भाजपाचे लोक दादागिरी करतात. भाजपाच कायदा-सुव्यवस्था पाळत नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही", असंही दानवे म्हणाले.
हे वाचलंत का :