छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र आता खुद्द अंबादास दानवेंनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम लावलाय. "एवढी मोठी जबाबदारी असताना, माझ्या बाबतीत येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. मागील दहा वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं पक्ष प्रमुखांना माहीत आहे," असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलंय. तसंच "अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळं जुना चेहरा आणि नवीन चेहरा असा प्रश्न निर्माण होत नाही. मी अद्याप स्पर्धेत आहे, ज्या दिवशी उमेदवारी निश्चित होईल, त्यादिवशी विषय संपेल," असं मत विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय.
सर्व चर्चा खोट्या : शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना दानवे म्हणाले, "माझ्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चा खोट्या आहेत. कालच मुंबईला जाऊन आलो, आज कुठलीही बैठक नाही. कोणी भूकंप म्हणत असेल तर त्यांना विचारा, मी इतका मोठा माणूस नाही. या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. मी जाणारच नाही, शिंदे सेना दोन पाच महिन्यांची आहे. त्यामुळं जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवसेनेची ठाकरे गटाची उमेदवारी व्यवस्थित जाहीर करत आहेत. काही जणांना तोंडी सांगितलं ते कामाला लागले आहेत. चर्चा आहे म्हणून मी जाईन असं होत नाही. मुख्यमंत्री यांना कामासाठी फोन लावतो, मी विरोधीपक्ष नेता आहे, त्यापुढं काही नाही." तसंच "राज्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशिव या ठिकाणी ठाकरे गट लढणार आहेत तर नांदेडात नवीन समीकरण निर्माण झाल्यानं तिथं सेनेची ताकद जास्त असल्यानं विचार करत आहोत. काँग्रसचे अनेक जण अशोक चव्हाण यांच्या सोबत गेल्यानं आम्ही तिथं इच्छुक आहोत," असंही दानवेंनी म्हटलंय. "उद्याच्या राहुल गांधी यांच्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित राहतील," अशी माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिलीय.
खैरे यांनी मला डावलले : यावेळी बोलताना त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले, "मी सर्वसामान्य माणूस, साध्या घरात राहतो. मला कशाची भीती नाही. मी बोलायला देखील घाबरत नाही. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचं स्तंभ पूजन केलं. मात्र याबाबत मला निमंत्रण नव्हतं, मला याबाबत माहिती देण्यात आली नाही. मी महत्त्वाचा पदाधिकारी मात्र मला कार्यालय सुरू करण्याबाबत माहिती नाही. त्याबाबत मी पक्ष प्रमुखांना माहिती दिली. कोणी हेकेखोरपणानं वागत असेल, तर मी सांगणार नाही. खैरे नेहमी मला डावलतात. मी त्यांच्याकडं पाहून नाही तर ठाकरे साहेबांकडे पाहून काम करतो. मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता आहे, पक्षाविषयी माझ्या मनात कुठलाही तिढा नाही. मी खैरे यांचं नाही तर पक्ष म्हणून काम करणार आहे. मी देखील जबाबदार पदाधिकारी आहे. ते वाईट आणि मी चांगला असं म्हणणार नाही. खैरे साहेब आमचे नेते आहेत. पक्षात स्पर्धा आहे आणि अशी स्पर्धा असायला पाहिजे. जो पर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तो पर्यंत स्पर्धा, नंतर नाही."
हेही वाचा :