मुंबई Ajit Pawar Meet Amit Shah : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 23 जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर रात्री उशिरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आँणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल सुद्धा उपस्थित होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये त्यांचा सलग 7 वा अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असला तरी महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेल्याची टीका विरोधक करत आहेत. मुंबईतून सर्वात जास्त केंद्रात कर जमा होतो. त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नाही, असा विरोधकांकडून आरोप होत आहे. अशातच अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 45 मिनिटं चर्चा झाली.
जागावाटपाबाबत चर्चा : संसदेचं अधिवेशन सुरू असताना अजित पवारांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. रात्री 1 वाजता अजित पवार हे अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले. 8 वाजता ते दिल्लीतून मुंबईसाठी रवाना झाले. विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना महायुतीत जागा वाटपावरूनसुद्धा रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळं जागावाटपावरून अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठकसुद्धा झाली. या बैठकीत निधी वाटपावरून ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामविकास विभागासाठी अधिकचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागितला. त्यावर अजित पवार यांनी,"आता जमिनी विकून पैसे द्यायचे का?" असं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलं. यावर गिरीश महाजनही संतापले. त्यांनी सिन्नर येथील एका स्मारकासाठी कोट्यावधीचा निधी कसा काय दिला? असा प्रश्न केला. यावर या दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप नेत्यांमध्ये सुरू झाले आहेत. या विषयाची चर्चाही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीत झाली असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
- शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा; राज्यात राजकीय भूकंप होणार? - Sharad Pawar Met CM Eknath Shinde
- "केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं?"; अर्थसंकल्पावरुन विरोधकांची सरकारवर टीका - Union Budget 2024
- विधानसभा निवडणुकीत 'सिंगल लाईन'वर धावणार मनसेचं रेल्वे इंजिन - MNS on Assembly Election