पुणे DCM Ajit Pawar : "बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना कोण-कोण फोन करत होतं हे मला माहीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र त्यांनी त्यावेळी नाव सांगितलं नव्हतं. यावर अजित पवार यांना आज प्रश्न विचारला असता, म्हणाले, " तुम्ही मला मूर्ख समजू नका. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मला जेवढा अधिकार दिलाय, तेवढाच मी वापरुन बोललेलो आहे. मला जे काही सांगायचं ते सांगितलं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय. तसंच त्यांनी जागावाटपाबाबतही मोठं वक्तव्य केलंय. महात्मा फुले जयंतीनिमित्त आज फुले वाड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं.
जागावाटपाचा तिढा सुटेल : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, " जागावाटपाचा तिढा संपूर्ण सुटणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत परत मुंबईला जाणार आहे. त्यावेळेसच आम्ही सर्वत्र चर्चा करुन जागा वाटप व्यवस्थित करुन घेणार आहोत.
फुलेवाड्यातील स्मारकासाठी प्रयत्न : "महात्मा फुले यांचं फुलेवाड्याचं स्मारक भव्य व्हावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस, मी आणि छगन भुजबळ सर्वांनी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सरकारनंसुद्धा प्रयत्न केले. परंतु जागा अपुरी पडत आहे. येणाऱ्या काळात फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहीत राहण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, " असे अजित पवार म्हणाले.
मोदींशिवाय पर्याय नाही : राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, " राज ठाकरे स्पष्ट वक्ते आहेत. राज ठाकरेंचा आदेश हा कार्यकर्त्यांसाठी अंतिम आदेश असतो. आता मोदींच्या नेतृत्वाशिवाय देशात दुसरं कुठलंही नेतृत्व सक्षम दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला. एकनाथ खडसे सुद्धा घरवापसी करत आहेत. गेल्या 40 वर्षात भाजपा वाढवण्याचं काम एकनाथ खडसेंसह अनेक नेत्यांनी केलंय. त्यामुळं त्यांनी स्वतःची भूमिका जाहीर केलेली आहे."
हेही वाचा :