पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून पुणे शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्यानं शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले असून सर्वच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. आता शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील आज आपली भूमिका मांडत, मी देखील शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलय. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
पक्षाकडून पैसे घेतले नाहीत : राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात नाराजी दिसून येत आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दीपक मानकर म्हणाले, "2012 पासून मी पक्ष संघटनेचं काम करत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी पक्षाकडे कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. मागणीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेटही घेतली होती. ते कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करतील, मागणीचा विचार करतील असं सर्वांना वाटलं होतं. पण जेव्हा तिकीट जाहीर झालं, त्यात माझं नाव नव्हतं. मी कुठे कमी पडलो, हे पक्ष पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं पाहिजे. कोणत्या मेरिटवर पक्षानं दोन्ही उमेदवारांना तिकीट दिलं आणि मी कुठं कमी पडलो, हे मला कळलं पाहिजे. या 14 महिन्यांत मी एक निष्ठावंत सदस्य म्हणून पक्षाचं काम केलं. कधीही पक्षाकडून पैसे घेतले नाहीत. मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की, पदाचा राजीनामा देऊ नका. पण त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी अजित पवार यांच्यासोबत असणार, पण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
सुनील तटकरेंना सवाल : "सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रुपाली चाकणकरांच्या बाबतीत दाखवली, त्यांचं पद वाढवून दिलं. तेवढी माझ्या बाबतीत का दाखवली नाही? असा सवालही दीपक मानकर यांनी तटकरेंना केला. "घराणेशाहीचं राजकारण करत बसला, तर कार्यकर्त्यांचं काय? आज भुजबळ यांच्या घरात उमेदवारी दिली खरी पण आम्ही लोकसभेत एकत्रित राहून जे काम केलं, त्याचं काय?" असा सवाल यावेळी दीपक मानकर यांनी पक्षातील वरिष्ठांना केलाय.
निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार अडचणीत : एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते तसंच पदाधिकारी हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे आज राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची वर्णी न लागल्यानं शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले असून सर्वच पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. आता शहराध्यक्षांनीच राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळं अजित पवार काय करणार? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
हेही वाचा