मुंबई Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड महिन्याभराचा अवधी शिल्लक असताना राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुती सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना महायुतीत असलेल्या अजित पवारांची साथ आता भाजपा आणि शिंदे गटाला नकोशी झाली आहे, अशा चर्चा वेगाने पसरू लागल्या आहेत. भाजपाच्या विजय संकल्प अभियानात दबक्या आवाजातसुद्धा या चर्चेने जोर धरला आहे. पितृपक्षानंतर जागावाटप जाहीर होणार असून, त्यापूर्वी अजित पवारांच्या पक्षाबाबत काय निर्णय घ्यावा, यासाठी भाजप पक्षश्रेष्ठीसुद्धा विचारमंथन करीत आहेत. त्याच कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे महाराष्ट्र, मुंबईतील दौरे वाढले असून, ते उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
भाजपामध्ये विचारमंथन : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा महायुतीला काही फायदा झालेला नाही ही बाब आता भाजप पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात आली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभेला बसू नये, याकरिता कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत, याबाबत भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना सत्तेत घेतल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला, असं उघडपणे सांगण्यात आलं होतं.
अजित पवारांना सोबत घेण्यास शिंदे गटाचाही विरोध : यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा उशिरा का होईना, परंतु ही बाब मान्य केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांचा, नेत्यांचा पूर्वीपासूनच विरोध होता. या कारणाने विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची घोषणा होण्याअगोदर अजित पवारांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, याकरिता मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू आहे. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्या बारामती मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना १ लाख ४८ हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभेत बसू नये, याबाबत पूर्ण दक्षता भाजपाकडून घेतली जात आहे. म्हणूनच अजित पवार यांची भूमिका आणि त्यांची साथ याचा किती फायदा होईल, याकडे शिंदे गट आणि भाजपा बारकाईने लक्ष देऊन आहेत.
"अजित पवार भ्रष्टाचाराचा महामेरू" : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे वर्षानुवर्षे अजित पवार यांच्या विरोधात लढत आले आहेत. अजित पवार म्हणजे "भ्रष्टाचाराचा महामेरू" अशा पद्धतीचा प्रचार या नेत्यांकडून करण्यात आला होता. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना सत्तेत घेण्यात आलं. अजित पवार यांना सत्तेत घेताना त्यावेळची समीकरणं वेगळी होती, या कारणाने तडजोड करावी लागते, असं जरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असलं तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता समीकरणं पूर्ण बदलली आहेत.
महायुतीत धुसफूस : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत १ लाख ५८ हजार मतांनी सुप्रिया सुळे यांनी दारुण पराभव केला. तरीसुद्धा सुनेत्रा पवार यांना मागच्या दाराने राज्यसभेत पाठवण्यात अजित पवारांचा हट्ट दिसून आला. महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना शिंदे गट अथवा भाजपाचा एकही नेता त्यादरम्यान उपस्थित नव्हता हे विशेष. याचा दुसरा अर्थ अजित पवार यांच्याबाबत महायुतीत धुसफूस सुरू आहे, अशी चर्चा आहे.
पितृपक्षानंतर योग्य निर्णय होणार : महाराष्ट्रात अजित पवार यांची साथ शिंदे गट आणि भाजपा यांच्यासाठी सध्या लाखमोलाची नाही. अजित पवार यांना बरोबर घेण्याबाबत अनेक बैठकांचं सत्र सुरू असून, पितृपक्षानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्यातसुद्धा अजित पवार यांच्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
झारखंडमधील राष्ट्रवादीचा चेहरा भाजपाच्या वाट्यावर? : दुसरीकडे झारखंडमधील अजित पवार गटाचे हुसेनाबाद मतदारसंघाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष कमलेश सिंग हे भाजपाच्या वाटेवर आहेत. 3 ऑक्टोबर रोजी कमलेश सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असून, झारखंडमधील ते अजित पवार गटाचे एकमेव आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात महायुतीत अजित पवारांचा सहभाग आता भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांना खटकत असताना दुसरीकडे कमलेश सिंग यांच्या होणाऱ्या भाजपा प्रवेशामुळे अजित पवारही मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. महायुतीत अजित पवार गटाच्या सहभागामुळे धुमसत असलेली आग लवकरच मोठा भडका होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः