शिर्डी Lok Sabha Result : शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानं शिर्डीतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उंटावरुन साखर वाटून जलोष साजरा केला.
साखर वाटून आनंद साजरा : शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेल्या लढतीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करत विजय संपादन केला. तसंच राज्यातील चर्चित ठरलेल्या नगर दक्षिणच्या लढतीत विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला असून या मतदारसंघात निलेश लंके जायंट किलर ठरल्यानं जिल्हाभरात लंके समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय. शिर्डी शहरात देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगरपरिषदे समोर एकत्र येत फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. तसंच उंटावरुन साखर वाटप करुन भाऊसाहेब वाकचौरे आणि निलेश लंके यांच्या विजयाचा अनोखा आनंद व्यक्त केला. शहरातून ढोल ताशांच्या गजरात विजयी रॅली काढून साई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय : या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेनी विजय मिळवला असून सुजय विखेंचा पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29 हजार 317 मतांनी विजयी झाले. त्यांना 6 लाख 24 हजार 797 मत मिळाली. तर पराभूत उमेदवार सुजय विखेंना 5 लाख 95 हजार 868 मतं मिळाली. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांना 4 लाख 76 हजार 900 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंना 4 लाख 26 हजार 371 मतं मिळाली. परिणामी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा 50 हजार 529 मतांनी पराभव केलाय.
हेही वाचा :