मुंबई Aaditya Thackeray : युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे हे मागील काही दिवसांपासून समाजकारण आणि राजकारण यापासून लांब असल्याचं चित्र आहे. तसंच ते प्रसार माध्यमांत देखील फारसे दिसले नाहीत. यावरुन 'गेला आदित्य कुणीकडे...?' असं म्हणत विरोधकांनी ठाकरे गट आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
विरोधकांची टीका : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालीय. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळं विविध पक्षांकडून राज्यात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मागील काही दिवसांपासून राज्यभर दौरा करुन जिल्हानिहाय सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून ते विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. एकीकडं आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत असताना आदित्य ठाकरे यात कुठंच दिसत नाहीत. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो दाखवत 'आदित्य ठाकरे कुठे गायब आहेत?' असा प्रश्न विचारलाय.
प्रिन्स नाईट लाईफमध्ये : "एकीकडं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करत असताना 'प्रिन्स युवराज' गायब कुठं आहेत? आदित्य ठाकरे आहेत कुठं? हे आता तुम्ही माध्यमांनीच शोधा. तुम्हीच आता प्रश्न उपस्थित करा," असं भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. तसंच "युवराज आदित्य ठाकरे यांना नाईट लाईफची आवड आहे. ते नेहमी नाईट लाईफवरती बोलत असतात. त्यामुळं सध्या ते नाईट लाईफमध्येच व्यस्त असतील," असा टोला देखील केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. "लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सर्वच राजकीय पक्ष सभा घेत आहेत. त्यांचे वडील सुद्धा सभा घेत असताना प्रिन्स कुठं आहेत? आदित्य ठाकरे गायब झालेत, हे आता माध्यमानी शोधावं," असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.
निवडणुकीच्या तोंडावर टीका : आदित्य ठाकरे कुठं गायब झालेत, यावरुन सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. याबाबतचा प्रश्न ठाकरे गटातील नेत्यांना विचारला असता, "सत्ताधारी पक्षातील नेते निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंना लक्ष करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळं आम्ही याला फारसं गांभीर्यानं घेत नाही," असं आमदार सुनील शिंदे यांनी म्हटलंय. तर "सत्ताधारी पक्षातील लोकांच्या या दळभद्री आरोप आणि टीकेला आम्ही भीक घालत नाही, निवडणुकीच्या तोंडावर ते काहीही टीका करत आहेत," असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा :