मुंबई Lok Sabha Elections 2024 : देशभरात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा येत्या 19 तारखेला होत असून या टप्प्यात देशभरातल्या 102 मतदार संघात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे संपत्ती आणि गुन्हेगारीचे विश्लेषण "असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स" या संस्थेनं केलं आहे. यातील काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 102 मतदारसंघांमध्ये सुमारे 1618 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 252 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत तर यापैकी 161 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1618 उमेदवारांपैकी 450 पेक्षा अधिक उमेदवार हे करोडपती आहेत, या उमेदवारांची सरासरी संपत्ती साडेचार कोटी रुपये इतकी आहे.
काय आहे उमेदवारांची संपत्ती स्थिती : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 1618 उमेदवारांपैकी 193 उमेदवार हे पाच कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेले आहेत. दोन ते पाच कोटी दरम्यान 139 उमेदवारांची संपत्ती आहे. तर 50 लाख ते दोन कोटीपर्यंत 277 उमेदवारांची संपत्ती आहे. दहा लाखापेक्षा कमी संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या 573 इतकी आहे.
हे आहेत सर्वाधिक श्रीमंत उमेदवार : या उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती असणारे उमेदवार म्हणजे मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ आहेत. त्यांची संपत्ती 716 कोटी 94 लाख इतकी आहे. त्या पाठोपाठ तामिळनाडू मधील इरोड मतदार संघाचे एआयएडीएमके पक्षाचे उमेदवार अशोक कुमार यांची संपत्ती 662 कोटी 46 लाख 87 हजार इतकी आहे. त्यानंतर तामिळनाडूमधीलच शिवगंगा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार देवनाथन यादव यांची संपत्ती 304 कोटी 92 लाख 21 हजार इतकी आहे.
सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार : देशात सर्वात कमी संपत्ती असलेल्या उमेदवारांमध्ये तामिळनाडू मधील थूतुकुडी मतदारसंघातील पुनराज के यांची संपत्ती 320 रुपये इतकी आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील रामटेक मतदार संघातील कार्तिक डोके हे अपक्ष उमेदवार असून त्यांची संपत्ती ५०० रुपये आहे. तर चेन्नई उत्तर मतदार संघातील सूर्यामुथू हे अपक्ष उमेदवार असून त्यांची संपत्तीही पाचशे रुपये आहे.
हे आहेत कर्जबाजारी उमेदवार : कर्जबाजारी उमेदवारांमध्ये तामिळनाडूमधील अरकोंनम मतदार संघातील डीएमके पक्षाचे उमेदवार एस जगथचकन कर्जबाजारी असून त्यांची एकूण संपत्ती 53 कोटी 45 लाख 87 हजार रुपये आहे. तर त्यांच्यावर 649 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज आहे. तामिळनाडू मधील शिवगंगा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार देवनाथन यादव यांची संपत्ती 304 कोटी 92 लाख रुपये आहे. मात्र, त्यांच्यावर कर्ज 98 कोटी 30 लाख 89 हजार रुपयांचे आहे. तर महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची संपत्ती 80 कोटी 37 लाख 22 हजार इतकी आहे. त्यांच्यावर कर्ज 55 कोटी 23 लाख 86 हजार रुपये इतकी आहे.
सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेले उमेदवार : पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या उमेदवारात अरुणाचल प्रदेश मधील अरुणाचल पश्चिम मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवांगतुकी यांचा समावेश असून त्यांनी 62 कोटी 10 लाख 25 हजार रुपयांची संपत्ती घोषित केलीय. त्यांनी एका वर्षातील मिळकत 13 कोटी 22 लाख 26 हजार रुपये ही नोकरी उद्योग या माध्यमातून दर्शवली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ यांनीही आपली संपत्ती 716 कोटी 94 लाख दाखवली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 12 कोटी 29 लाख 70 हजार रुपये आहे. जो की त्यांचा पगार आणि व्याजातून दाखवण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमधील वेल्लोर मतदार संघातील डीएमके पक्षाचे उमेदवार डी एम कथिर आनंद आहेत. त्यांनी आपली संपत्ती 88 कोटी 80 लाख 19 हजार रुपये दाखवली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न ११ कोटी 99 लाख 80 हजार रुपये हे व्यवसाय आणि मालमत्तेतून येणारे उत्पन्न दाखवले आहे.
हेही वाचा -
- वर्धा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी; रामदास तडस की अमर काळे? - Lok Sabha Election 2024
- मोदींची हवा, कुठे नरम, कुठे गरम; विरोधकांनी दिली खरमरीत प्रतिक्रिया तर महायुतीला दिसतोय मोदींचा करिश्मा - Lok Sabha Election 2024
- पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना, प्रशासनाची तयारी पूर्ण; नागपूर, रामटेकमध्ये 124 संवेदनशील मतदान केंद्रे - Lok Sabha Election 2024