मुंबई : थोर महापुरूष, देव-देवता, संत महंतांचं स्मरण करत, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १०६ सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतल्यानं आतापर्यंत २७९ आमदार शपथबद्ध झाले आहेत. उर्वरित ८ आमदार अनुपस्थित राहिल्यानं त्यांचा शपथविधी आता सोमवारी पार पडणार आहे.
हातात संविधानाची प्रत घेऊन घेतली शपथ : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या महाविकास आघाडीच्या सदस्यांपासून शपथविधाला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारकीची पहिली शपथ घेतली. त्यांनी हातात संविधानाच पुस्तक घेऊन सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, ज्योती वाघमारे यांनी सभागृहात संविधान दाखवत शपथ पूर्ण केली.
आदिवासी ग्रामदेवतांचं केलं स्मरण : अनेक आमदारांनी संत महंतांचं स्मरण केलं. शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम् म्हणत सभागृहाचं लक्ष वेधलं. सुनील प्रभू यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाला साकडं घालत, बाळूमामाच्या नावानं चांगभल, अशी घोषणा दिली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी जय गिरनारी असं म्हणत शपथ घेतली. आमश्या पाडवी यांच्यासह आदिवासी भागातील आमदारांनी आदिवासी ग्रामदेवतांचं स्मरण केलं. यावेळी अनेकांनी जय जवान, जय किसान अशा घोषणा देखील दिल्या.
विक्रम पाचपुते यांचं नाव चुकलं : शपथविधी नावाच्या यादीत माजी मंत्री तथा भाजपाचे दिवगंत आमदार बबनराव पाचपुते यांचं चिंरजीव विक्रम पाचपुते यांचं नाव चुकलं. विक्रम ऐवजी विकास झाल्याची चूक हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर विक्रम पाचपुते यांनी शपथ पूर्ण केली.
८ आमदार अनुपस्थितीत : विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ विधीसाठी ठेवले. तर तिसऱ्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. २८८ पैकी पहिल्या दिवशी १७३ तर दुसऱ्या दिवशी १०६ आमदारांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके अनुपस्थित राहिले. त्यापैकी जंयत पाटील यांनी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यानं उपस्थित राहणार नाही, असं पत्र विधिमंडळाला दिलं होतं.
हेही वाचा -