माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन
संत ज्ञानेश्वरींच्या या ओळी सार्थ करणारी मराठी भाषा. आपल्या माय माऊलीचं योगदान जेवढं अपण घडण्यामध्ये असतं तितकेच मोठं योगदान हे मातृभाषेचं असतं. स्वामी विवेकानंदांना शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदीत भाषण करत असताना एकाने विचारले की आपण आपल्या मातृभाषेत का बोलता? त्याचे उत्तर त्यांनी दिली की, तुमची मातृभाषा म्हणजे तुमची आई आणि जर तुमच्या आईला तुम्ही किंमत देत नसाल तर दुसऱ्याच्या आईला काय स्थान द्याल?' तेव्हा मातृभाषेविषयी गर्व असणे म्हणजे दुसऱ्या भाषेला कमी लेखणे असे होत नाही. (Marathi language day)
750 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या या मायमराठीने आपल्याला काय दिलं नाही. संस्कृत जेव्हा देवांची भाषा होती तेव्हा सर्व सामान्य मराठी माणसाला गीतेचा अर्थ निरूपण करणारी भावार्थदीपिका म्हणजे आपली ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली गेली तेव्हा त्या माऊलीचे वय होते 16 वर्षे. काय ती अलौकिक अशी प्रतिभा आणि शेवटी पसायदानात त्या विश्वात्मक देवाकडे जे मागणे मागितले ते, जो वांछील ते तो लाहो। म्हणजे एक निस्वार्थ असे सर्व प्राणिमात्रांचं कल्याण करण्यासाठी केलेली प्रार्थना म्हणायला हरकत नाही.
तुकाराम ज्या भागवत धर्माचे कळस झाले, त्या तुकारामांच्या अभंगानी खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती घडवून आणली. "असाध्य ते साध्य करण्या सायास । कारण अभ्यास तुका म्हणे।" पासून ते "बोलाचीच कढी। बोलाचाच भात । जेवुनिया तृप्त कोण जाहला"। म्हणणारे तुकाराम मराठी मनावर 400 वर्षानंतरही गारुड करून आहेत. त्यातच त्यांचं यश असं मी मानतो. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। ही गणपतीची आरती आणि सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी। ही हनुमानाची आरती आज आपल्या सर्वांच्या मुखोद्गत असली तरी ती रामदास स्वामींनी लिहिली आहे हे किती जणांना माहीती आहे?
अर्वाचिन साहित्यात बाबा पदमनजी यांची यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादम्बरी मानली जाते. त्यामध्ये केशवपनाच्या अनिष्ठ प्रथेवर हल्ला चढविण्याचे धाडस त्या काळात त्यांनी केले आणि त्यामुळे यमूचे दुःख एकट्या यमूचं दुःख न राहता सर्व मानव जातीचं दुःख होतं. समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा, चालीरीती यावर हल्लाबोल करत सामाजिक परिवर्तनाचं काम पारतंत्र्याच्या काळात आपल्या नाटक, कादंबरी, कविता, कथांमधून करणाऱ्या त्या सर्व सरस्वती पुत्रांना त्रिवार वन्दन.
जग बदल घालून घाव। मज सांगून गेला भीमराव। म्हणत दलितांच्या दुःखाला लोकशाहीर आण्णा भाऊ साठेंनी वाचा फोडली. हस्ती दन्ति मनोऱ्यामध्ये बसून साहित्य लेखन न करता ज्या समाजात जन्माला आले त्या समाजात बदल घडवून आणण्याचं काम फार महान कार्य आहे. सावित्रीबाईंना ज्योतिबांबरोबर स्त्री शिक्षणासाठी राहते घर सोडावे लागले आणि त्या वेळी त्यांनी जर घर सोडलं नसतं तर आजही आमुच्या सावित्रीच्या लेकी चार भिंतीत बंदिस्त राहिल्या असत्या.
मूकनायक, बहिष्कृत भारत, रिडल्स इन हिंदुईसम, रामायण महाभारत हे काय गौडबंगाल? लिहिणाऱ्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा रात्री 2 वाजता लिहित बसलेलं एका पत्रकारान पाहिलं आणि विचारलं की, बाबासाहेब सर्व नेते मंडळी झोपली एवढ्या उशिरा आपण काय करता? तेव्हा बाबासाहेबांचं उत्तर होतं, ती लोक नेते मंडळी झोपली कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मला जागायलाच हवं कारण माझा समाज झोपला आहे". झोपलेल्यांना जागं करण्याचं काम आपल्या लेखणीच्या प्रभावानं या समाज सुधारकांनी, साहित्यिकांनी केलं त्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं.
ज्या कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्यांचं मराठी सारस्वतासाठीचं योगदान शब्दात मांडणंअवघड आहे. युगामागूनी युगे लोटली किती रे । भास्करा किती करू मी तुझी वंचना असं पृथ्वीचं प्रेमगीत असो, कोलम्बस गर्वगीत असू देत वा वेडात मराठे वीर दौडले सात, गरजा जयजयकार क्रान्तिचा या कवितांबरोबरच वि वा शिरवाडकर उर्फ तात्यासाहेबांनी नटसम्राट सारखं अजरामर मानवी नात्यांचा गुंता उलगडवणारं महानाट्य लिहिल, जे आजही तेव्हढेच लोकप्रिय आहे.
मराठी पाऊल नेहमीच पुढे पडत राहो आणि दिवसेंदिवस या सारस्वताची सेवा करण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वाना आणि आमच्या भावी पिढीलाही प्राप्त होवो हीच या जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सदिच्छा.