कुवेत सिटी Kuwait Fire : आखाती देश कुवेतमधील मनकाफ शहरातील एका इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. यात 49 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे. सर्व मृत मजूर असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या इमारतीत आग लागली तिथं कामगार राहात होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता इमारतीला आग लागल्याची माहिती मेजर जनरल ईद रशीद हमाद यांनी दिलीय. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुखः व्यक्त केलंय.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केला घटनेबद्दल शोक व्यक्त : देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिलं की, “कुवैत शहरातील आगीच्या घटनेनं खूप दुःख झालं. ज्यात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. आम्ही पुढील माहितीची वाट पाहात आहोत. या दु:खद घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. भारतीय दूतावास या घटनेमुळं प्रभावित झालेल्या सर्व लोकांना पूर्ण मदत करेल."
कामगारांच्या इमरातीला आग : सरकारी टीव्ही चॅनलशी बोलताना एका वरिष्ठ पोलीस कमांडरनं सांगितलं की, इमारतीमध्ये कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि तिथं मोठ्या संख्येनं कामगार होते. यात डझनभर लोकांची सुटका करण्यात आली. पण दुर्दैवानं आग लागल्यानंतर इमारतीमध्ये पसरलेल्या धुरामुळं अनेकांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या नोकरीबद्दल किंवा ओळखीची माहिती दिलेली नाही. छोट्या इमारतीत जास्त कामगार ठेवण्याविरुद्ध आम्ही नेहमी इशारा देतो.
आग आटोक्यात, कारणाचा शोध सुरू : कुवेतच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, आगीच्या घटनेनंतर सुमारे 43 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी नोंदवलेल्या 35 मृत्यूंमध्ये या चार मृत्यूंचा समावेश आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग आटोक्यात आली असून, त्याच्या कारणाचा शोध सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
ठाण्यात 27 मजली इमारतीत लागली भीषण आग, गुदमरल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू - Thane Fire News
मुंबईत अग्नितांडव! ताडदेव परिसरातील गोदामाला भीषण आग - Mumbai Fire