मॉस्को Russia President Election : रशियात आजपासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. रशियात एका दिवसाऐवजी तीन दिवस मतदान घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोणत्याही फौजदारी खटल्यात तुरुंगवासाची शिक्षा भोगत नसलेला 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही रशियन नागरिक या निवडणुकीत मतदान करु शकतो. मॉस्कोच्या वेळेनुसार 17 मार्चला रात्री निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ शकतात.
पुतिन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणं निश्चित : निवडणुकीपूर्वीच पुतिन पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनणं निश्चित मानलं जातंय. रशियात गेल्या 24 वर्षांपासून पुतिन यांची सत्ता आहे. पुतीन यांचे बहुतांश विरोधकांपैकी काही सध्या तुरुंगात आहेत तर काहींना निवडणूक आयोगानं निवडणुकीसाठी अपात्र घोषित केलंय. रशियाच्या निवडणूक आयोगानुसार देशात 11.23 कोटी मतदार आहेत. यात रशियन-व्याप्त युक्रेनियन प्रदेशातील नागरिकांचाही समावेश आहे. याशिवाय सुमारे 19 लाख मतदार देशाबाहेर राहतात. यावेळी रशियामध्ये ऑनलाइन मतदानाची सुविधाही असेल. ही सुविधा रशिया आणि क्रिमियाच्या 27 प्रदेशांमध्ये असेल. क्रिमिया हा युक्रेनचा प्रदेश आहे. हा प्रदेश 2014 मध्ये रशियानं ताब्यात घेतला होता.
पुतीन 2036 पर्यंत राहू शकतात रशियाचे अध्यक्ष : पुतिन यांनी 2021 मध्ये केलेल्या कायद्यानुसार ते 2036 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहू शकतात. खरं तर, 2018 च्या निवडणुकीपर्यंत, रशियात कोणताही राष्ट्राध्यक्ष सलग दोन टर्मपेक्षा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष राहू शकत नव्हता. याच कारणामुळं 2000 ते 2008 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहिल्यानंतर पुतिन यांनी 2008 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही. यानंतर, 2012 मध्ये ते पुन्हा रशियात सत्तेवर आले. यादरम्यान पुतीन 2008-12 पर्यंत रशियाचे पंतप्रधान होते. नव्या कायद्यानुसार, सलग दोन अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही पुतिन निवडणूक लढवू शकतात.
पुतिन यांच्याशिवाय आणखी 3 उमेदवार निवडणुकीत : रशियाच्या निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार पुतिन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे निकोलाई खारिटोनोव्ह, लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे लिओनिड स्लटस्की आणि न्यू पीपल्स पार्टीचे व्लादिस्लाव डव्हान्कोव्ह यांची नावंही मतपत्रिकेवर आहेत. तिन्ही राजकीय पक्ष क्रेमलिन समर्थित पक्ष मानले जातात. पुतिन यांच्या धोरणांचं आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धाचे ते समर्थक आहेत. 2018 च्या निवडणुकीत पुतिन यांना 76.7 टक्के मतं मिळाली, तर कम्युनिस्ट पक्षाला 11.8 टक्के मतं मिळाली.
निवडणुकीच्या एका महिन्याआधी पुतिन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाचा संशयास्पद मृत्यू : पुतिन यांचे रशियातील सर्वात मोठे विरोधक आणि प्रतिस्पर्धी मानले जाणारे अलेक्सी नवलनी यांचा 16 फेब्रुवारी रोजी संशयास्पद परिस्थितीत तुरुंगात मृत्यू झाला होता. निवडणुकीपूर्वी ते तुरुंगातून सतत पुतीन यांच्याविरोधात वक्तव्यं करत होते. नवलनी यांना 2021 मध्ये 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष म्हणजे पाश्चात्य देशांकडून सातत्यानं दबाव येत असतानाही नवलनी यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रशियाची राजकीय व्यवस्था कशी : रशियाची संसद ज्याला फेडरल असेंब्ली म्हणतात, त्याचेही भारतासारखे दोन भाग आहेत. वरिष्ठ सभागृहाला फेडरेशनची परिषद म्हणतात आणि कनिष्ठ सभागृहाला स्टेट ड्यूमा म्हणतात. रशियात राष्ट्राध्यक्ष पद सर्वात शक्तिशाली आहे. भारतात पंतप्रधानांना असणारे अधिकार रशियामध्ये राष्ट्रपतींना असतात. रशियातील सत्तेत दुसरी सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणजे पंतप्रधान, तिसरी सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणजे फेडरल कौन्सिलचे (अप्पर हाऊस) अध्यक्ष असतात.
हेही वाचा :