नवी दिल्ली/वॉशिंग्टन Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आज आयोजन होणार आहे. यानिमित्त जगभरातील भारतीय या ऐतिहासिक प्रसंगी आपला अभूतपूर्व उत्साह आणि भक्ती दाखवून भव्य उत्सव आयोजित करणार आहेत. जगभरातील विविध देशांमध्ये भारतीयांकडून कार रॅली काढण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. आज प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जगभरातील भारतीय लोक विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत.
अमेरिकेत डझनभर कार्यक्रम : आज अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त अमेरिकेत सुमारे 12 कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अमेरिकेत न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर ते बोस्टनपर्यंत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना साजरी केली जाईल. भारतातील कार्यक्रमांप्रमाणेच वॉशिंग्टन डीसी, एलए आणि सॅन फ्रान्सिस्को इथं अनेक कार्यक्रम होणार आहेत. टेक्सास, इलिनॉय, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि जॉर्जियासह इतर राज्यांमध्येही होर्डिंग लावण्यात आले आहेत. अमेरिकेतील भारतीय समुदायानं अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त अनेक कार रॅलींचं आयोजन केलंय. तसंच 'प्राण प्रतिष्ठा'च्या दिवशी आणखी अनेक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे.
मॉरिशसमध्ये भारतीय अधिकाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सुट्टी : अयोध्येतील मॉरिशसमधील भारतीय आज एकत्र येत आहेत. भारतीय हे मंदिरांमध्ये दिवे लावून 'रामायण' वाचत आहेत. अयोध्येत होणाऱ्या अध्यात्मिक कार्यक्रमाबाबत मॉरिशसमध्ये जनता एकजुटीनं उभी आहे. यामुळं मॉरिशसमध्ये भक्ती आणि सांस्कृतिक उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय. मॉरिशस सरकारनं आज भारतीय अधिकाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केलीय. अयोध्येतील रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी आयोजित करण्यात येणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी देणं, हा यामागचा उद्देश आहे.
ब्रिटनमध्ये मंगल कलश यात्रेचं आयोजन : ब्रिटनमध्येही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्सवाचं वातावरण आहे. तेथील हिंदू मंदिरांमध्ये ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सोहळ्याबाबत ब्रिटनमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये सुमारे 250 हिंदू मंदिरे आहेत. त्या सर्वांमध्ये आज उत्सवाची तयारी करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये सामुदायिक कार्यक्रमांपासून ते कार रॅली आणि विशेष 'आरती' ते 'अखंड रामायण' पठणापर्यंतचे कार्यक्रम सुरू आहेत. ब्रिटनमधील भारतीय समुदाय ‘दुसरी दिवाळी’ म्हणून हा सण साजरा करत आहेत. ब्रिटनमधील भारतीय समुदायानं लंडनमध्येही कार रॅली काढली.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत भारतीयांची कार रॅली : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जगभरात प्रचंड उत्साह असताना ऑस्ट्रेलियातील शेकडो मंदिरांमध्ये भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याच्या एक दिवस आधी, सिडनीतील भारतीय समुदायानं कार रॅलीचं आयोजन करुन आनंद साजरा केला. या रॅलीत 100 हून अधिक गाड्यांचा सहभाग होता.
नेपाळमध्ये अभूतपुर्व उत्साह : अयोध्येसोबतच नेपाळमधील देवी सीतेची मातृभूमी असलेलं जनकपूर धाम, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि उत्साहानं भरलंय. शहरात 24 तास प्रभू राम आणि सीता यांचं भजन गुंजत असते. जानकी मंदिर दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. प्रत्येक जनकपूर धामवासीयांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत आहे. नेपाळमधील जनकपूर येथील मुख्य महंत आणि छोटा महंत यांना अयोध्येतील समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलंय. ते अयोध्येला रवाना झाले आहेत.
- तैवानमध्ये कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण : इंडियन असोसिएशन ऑफ तैवानच्या वतीनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय समाजातील लोकांना प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट पाहता येणार आहे. तसंच इस्कॉन तैवाननं भारतीय समुदायासह तैवानमध्ये रविवारी दोन कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं.
हेही वाचा :