इस्लामाबाद Pakistan Election 2024 : पाकिस्तानमध्ये 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या संसदीय आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतमोजणी अजूनही जारी आहे. निवडणुकीपूर्वी, नवाज शरीफ यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात होतं, मात्र तुरुंगातून निवडणुकीची कमान सांभाळणाऱ्या इम्रान खाननं सर्वांनाच हैराण केलंय. त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पाठिंबा दिलेले उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र विशेष म्हणजे मतमोजणीदरम्यानही नवाज शरीफ आणि इम्रान खान यांच्या पक्षानं सरकार स्थापनेचा दावा केलाय.
इम्रान खान आघाडीवर : पाकिस्तानमधील 265 नॅशनल असेंब्लीच्या जागांपैकी 224 जागांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यापैकी इम्रान खान यांच्या पीटीआयनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी 91 जागा जिंकल्या आहेत. तर पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) ने 64 जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीनं 50 जागा जिंकल्या, तर इतरांनी 19 जागा जिंकल्या. निवडणूक आयोगानं निकाल जाहीर करण्यास फार उशीर केल्यानं निवडणुकीत हेराफेरीचे आरोप होत आहेत. तुरळक हिंसाचार आणि मोबाईल इंटरनेट बंद अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशात निवडणूक पार पडली होती.
तीन पक्षात मुख्य लढत : पाकिस्तानातील या निवडणुकीत डझनभर पक्ष रिंगणात होते. मात्र मुख्य लढत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ, तीन वेळचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांच्यात होती. देशात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 265 जागांपैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे त्या जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
शरीफ कुटुंबाचा विजय : इम्रान खान (71) तुरुंगात असून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या पक्षाचं चिन्ह 'क्रिकेट बॅट' हिरावून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर खान यांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. दुसरीकडे, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह त्यांचा मुलगा हमजा शहबाज, मुलगी मरियम नवाज आणि धाकटा भाऊ शेहबाज शरीफ पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लाहोरमधून विजयी झाले आहेत. मात्र पीपीपी नेते बिलावल भुट्टो झरदारी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
इम्रान खानचा दावा : पीटीआयनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर दावा केला आहे की, फॉर्म 45 वरून मिळालेल्या डेटानुसार त्यांनी 265 पैकी 150 पेक्षा जास्त नॅशनल असेंबली जागा जिंकल्या आहेत. फॉर्म 45 हा निवडणूक निकालांचा प्राथमिक स्त्रोत आहे, जो प्रत्येक मतदान केंद्रावरील प्रत्येक उमेदवाराची मतं प्रतिबिंबित करतो. इम्रान खान यांच्या पक्षानं सांगितलं की, "पीटीआयनं नॅशनल असेंब्लीच्या 150 हून अधिक जागा जिंकल्या आहेत आणि गाझियाबाद, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ते मजबूत स्थितीत आहेत."
निकालास उशीर झाल्यानं गोंधळ : गृह मंत्रालयानं म्हटलं की, निकालाच्या विलंबाबाबत मीडिया आणि जनतेमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची त्यांना जाणीव आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाला. निवडणूक आयोगानं निकाल जाहीर करण्यास बराच विलंब केल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. पाकिस्तानातील सर्वात मोठं शहर कराचीमध्ये सर्वाधिक गोंधळ दिसला.
हे वाचलंत का :