देर अल-बालाह (गाझा पट्टी) : इस्रायलनं पुन्हा एकदा आक्रमकपणे गाझा पट्ट्यात हल्ले सुरू केले आहेत. रविवारी पहाटे मध्य गाझामध्ये (Israeli Airstrike On Gaza Mosque) इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर अल अक्सा रुग्णालयानं दिलेल्या निवेदनात देर अल-बालाह शहरातील रुग्णालयाजवळील प्रार्थनास्थळाजवळ आश्रय घेत असलेल्या स्थलांतरित लोकांवर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलंय.
गाझा प्रार्थनास्थळावर हल्ला : रुग्णालयाच्या नोंदीवरुन असं दिसून आलंय की, मृत्यू झालेले सर्व पुरुष होते. तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रार्थनास्थळावरील हल्ल्याबाबत इस्रायली सैन्यानं अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमुळं गाझामधील पॅलेस्टिनी लोकांचा मृतांचा आकडा आता 42,000 च्या जवळ पोहोचला आहे. यापैकी किती सामान्य नागरिक आणि किती दहशतवादी होते, याविषयी अद्याप मंत्रालयानं कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? : 7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलवर हल्ला (Israel Hamas War) केला होता. या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. यानंतर इस्रायलनं हमासच्या गाझा भागात हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. 12 लाख लोकं बेघर झाली आहेत. हमासला लेबनॉनमध्ये असलेल्या हिजबुल्लाहचा पाठिंबा आहे. हमासच्या समर्थनार्थ हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करत आहे. गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत हल्ले थांबवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नुकतेच इस्रायलनं लेबेनॉनवर हल्ले करत हिजबुल्लाहच्या प्रमुखाला यमसदनी धाडले होते.
हेही वाचा -