डेरा मुराद जमाली- पाकिस्तानमधील डेरा मुराद जमाली परिसरात हिंदू समुदायाच्या मुलीचं अपहरण झाल्या घटना घडली आहे. या घटनेमुळे संतापलेल्या हिंदू समुदायाच्या लोकांनी पोलीस आणि प्रशासनाविरोधात रस्त्यावर आंदोलन केले. हिंदू समुदायासोबतच स्थानिक हिंदू व्यापाऱ्यांनी मुलीच्या अपहरणावरून तीव्र रोष व्यक्त केला. अपहरण झालेल्या मुलीला शोधून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
हिंदू मुलींचे अपहरण होत असताना सिंध सरकार त्यावर कठोर कारवाई करत नाही. अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्यान हिंदू समुदायाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या सुस्तावलेपणाबद्दल निराशा व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू तरुणीचे सुक्कुरमधून अपहरण करण्यात आले. हिंदू समुदायाचे ज्येष्ठ नेते मुखी माणक लाल आणि सेठ तारा चंद यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध लोकांनी सहभाग घेतला.
संपूर्ण देशभरात आंदोलन करण्याचा इशारा- व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे ताज बलूच, जेआई युवा शाखा लियाकत अली चकर, बाजाराचे अध्यक्ष मीर जान मेंगल, मौलाना नवाबुद्दीन डोमकी, खान जान बंगुलाजी आणि हरपाल दास हे आंदोलनात सहभागी झाले. अपहरण झालेल्या मुलीला सुरक्षित परत आणावे, अशी स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्याकडं मागणी केली आहे. तसंच अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी केली. हिंदू समुदायानं संपूर्ण देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
समान कायदा लागू करावा- ह्यूमन राइट्स फोकस पाकिस्तानने (एचआरएफपी) अल्पसंख्यांकाच्या छळावरून सरकारवर जोरदार टीका केली. समाजातील सर्व समुदायासाठी समान कायदा लागू करण्याची एचआरएफपीने मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ख्रिश्चन, शीख, हिंदूसह अन्य अल्पसंख्याक लोकांवर हल्ले झाले आहेत. ह्यूमन राइट फोकस पाकिस्तान ही समाजसेवी एनजीओ १९९४ मध्ये स्थापन झाली. मानवाधिकारांचा प्रचार आणि संरक्षण करण्यासाठी ही एनजीओ कार्यरत आहे. धार्मिक अल्पसंख्याक, महिला आणि मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी एनजीओकडून काम केले जाते. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या दृष्टीकोन आणि विचारानुसार नवीन सरकारनं नागरिकांकरिता समान कायदा लागू करावा, अशी संस्थेनं अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात अलीकडच्या काळात अल्पसंख्याक समुदायावर हल्ले वाढल्यानं त्यांना अधिक असुरक्षित वाटू लागलं आहे. संस्थेचे अध्यक्ष नवीद वाल्टर म्हणाले, नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच अल्पसंख्यांक समुदायावरील हल्ल्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे चिंताजनक स्थिती आहे.
हेही वाचा-