Health Benefits Of Amla : अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असे फळ म्हणजे आवळा. दररोज एक आवळा खाल्ल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. मधुमेहग्रस्तांसाठी आवळा एक वरदानच आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा उत्तम पर्याय आहे. आवळ्याच्या सेवनानं चयापचय सुधारते. तसंच यातील टॅनिन, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह, प्रथिनं, पोटॅशिम यांसारख्या पोषक घटकांनी शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आवळा अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोतदेखील आहे.
आवळा त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. आवळ्याचं रोज सेवन केल्यास चेहऱ्यावर चमक येते. तसंच मुरुमांची समस्यादेखील कमी होते. केस गळती रोखण्यासाठी आवळा रामबाण आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार, आवळ्यामध्ये अँटी-हायपरलिपिडेमिया, अँटिडायबेटिक, अँटिकॅन्सर आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात.
- आवळा खाण्याचे फायदे
- हृदय निरोगी ठेवते: आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. तसंच आवळा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळा नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळा उत्तम आहे. विविध आजार आणि हंगामी संसर्गांपासून संरक्षण होते.
- त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: आवळा चेहऱ्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. मुरुमांची समस्या दूर करतं. तसंच केसाच्या समस्येवरदेखील आवळा उत्तम आहे. आवळ्यातील पोषक घटकांमुळे केस मजबूत होतात. तसंच केस अकाळी पांढरे होण्यास प्रतिबंध करते.
- वजन कमी होते : वजन कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. आवळ्यातील फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. परिणामी तुम्ही अतिरिक्त कॅलरी सेवन करत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- दृष्टी सुधारते: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात असतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. नियमित आवळा खाल्ल्यास दृष्टी तर सुधारते शिवाय मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
- रक्तातील साखरेचं नियमन करते: काही अभ्यासानुसार आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यातील पॉलिफेनॉल इन्सुलिनचं उत्पादन सुधारतात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. जे मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.
- याव्यतिरिक्त आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, क्वेर्सेटिन आणि इलॅजिक ऍसिड असतं, जे जळजळ कमी करते आणि कर्करोग टाळण्यास मदत करतं.
- आवळ्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यानं चयापचय सुधारतं. तसंच संक्रमण आणि जीवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासदेखील मदत करतं. तसंच पचनक्रिया सुरळीत होते.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9137578/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)