Best Time To sleep And Wake Up : आजकाल तरुणांना रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय लागली आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी मुळात या दोन्ही सवयी घातक आहेत. पुरेशी झोप घेणं हा निरोगी राहण्याचा कानमंत्र आहे. डॉक्टर 7 ते 9 तास झोपण्याचा सल्ला देतात. मात्र, अयोग लाइफस्टाइमुळे अनेकांची रात्री पुरेशी झोप होत नाही. याचा परिणाम दिवसभर तर जाणवतोच. उलट अपूर्ण झोपेमुळे आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवतात.
"अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटीच्या तज्ञांच्या संशोधनातील माहितीनुसार, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची झोप देखील वेगवेगळ्या प्रमाणात असते. प्रत्येक व्यक्तीनं दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे.''
0-3 महिन्यांचे बाळ : नवजात अर्भकांपासून ते तीन महिन्यांच्या बाळापर्यंत योग्य झोप खूप महत्वाची असते. जन्मांतर लगेचच त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. तज्ञांच्या मते, नवजात बालकांनी दिवसातून सुमारे 14-17 तास झोपलं पाहिजे.
4-11 महिने वयोगटातील बाळ : या वयोगटातील बाळांचा मेंदू आणि शरीर विकसित होत असते. या स्थितीत त्यांना दररोज 12-15 तासांची झोप आवश्यक असते.
1-2 वर्षे वयोगटातील मुलं : तज्ज्ञांच्या मते, एक ते दोन वर्षे वयोगटातील मुलांना निरोगी राहण्यासाठी दररोज 11-14 तासांची झोप आवश्यक आहे.
3-5 वर्षांची मुलं : या वयात बरीच मुलं प्राथमिक शाळेत जातात. शाळेतील मुलांसोबत खेळून ते थकलेली असतात. त्यामुळे या वयात निरोगी राहण्यासाठी 10-13 तास झोप घेणं आवश्यक आहे.
६-१२ वर्षे वयाची मुलं : या वयात मुलांमध्ये अनेक विकासात्मक बदल होतात. यामुळं निरोगी जीवन जगण्याकरता मुलांना दररोज किमान 9-12 तासांची झोप आवश्यक आहे.
13-18 वर्षे : या वयात बहुतेक किशोरवयीन मुलं खेळणं तसंच अभ्यास करण्यासारख्या आवडत्या शारीरिक हालचाली करण्यात व्यग्र असतात. तसंच या वयात शरीरात पुनरुत्पादन अवयव विकसित होतात. यामुळे तज्ज्ञांच्या मते, दररोज 8-10 तासांची झोप आवश्यक आहे.
18-60 वर्षे : कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक समस्या आणि आरोग्याशी संबंधित कारणांमुळे या वयातील बरेच लोक शरीराच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे झोपेची कमतरता जाणवते. या वयात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला दररोज 7- 9 तासांची झोप आवश्यक असते.
वय 61 आणि त्याहून अधिक : साधारणपणे या वयात शरीरातील काही प्रक्रिया मंदावतात. शिवाय, अनेक वृद्ध लोक सांधेदुखी आणि निद्रानाश यासारख्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होतात. यामुळे तज्ज्ञ या वयातील लोकांना निरोगी राहण्यासाठी दररोज 7-8 तास झोपण्याचा सल्ला देतात.
रात्री 10 ला झोपणे उत्तम : निरोगी आरोग्यासाठी दररोज रात्री 10 वाजेपर्यंत झोपावं. झोपण्याची हीच योग्य वेळ आहे. अनेक वैद्यकीय तज्ञ रात्री 10 ते 11 दरम्यान झोपण्याचा सल्ला देतात. लोकांनी रात्री उशिरापर्यंत झोपू नये. तसंच दररोज ठराविक वेळी झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती - साधारणपणे सकाळी ६ ते ८ या वेळेत उठणे योग्य आहे. सकाळी लवकर उठल्यानं शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात. यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहातं.
7 ते 8 तासांची झोप महत्त्वाची : प्रत्येकानं निरोगी राहण्यासाठी दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घेतली पाहिजे. योग्य झोप न घेतल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेळेवर झोपल्यास शरीराचे कार्य सुधारते. त्यामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतात.
पुरेशी झोप न घेतल्याचे दुष्परिणाम
- चिडचिड, नैराश्य, चिंता बळावते
- प्रजनन क्षमता कमी होते
- उच्च रक्तदाब तसंच आरोग्यविषयक इतर समस्या उद्भवतात
- रोगप्रतिकार शक्ती कमी होते
- स्मरणशक्ती संबंधित समस्या
- हृदयरोग
अधिक माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करा.
https://sph.umich.edu/pursuit/2024posts/best-diet-for-healthy-sleep.html
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)