Rice Storage Tips : बरेच लोक सहा महिने किंवा वर्षभर पुरेल एवढे तांदूळ किंवा इतर धान्य घरात साठवून ठेवतात. हजारो रुपये खर्च करून विकत घेतलेल्या या धान्याला काही महिन्यांमध्ये अळ्या किंवा किडे लागतात. यामुळे धान्यांचे नुकसान होते. शिवाय असे धान्य खाल्ल्यानं प्रकृती खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यात किड लागलेले धान्य स्वच्छ करणे फार किचकट काम आहे. परंतु, धान्य स्वच्छ करणे गरजेचं आहे. याकरिता तुम्ही खाली दिलेल्या काही टिप्स फॉलो केल्यास डब्यातील धान्य सुरक्षित राहू शकतात. चला तर पाहूया धान्य जास्त काळ चांगले ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे.
- हिंग: तांदळामध्ये किडे लागू नये म्हणून त्यात हिंग घालून ठेवा. हिंगाच्या तिखट वासामुळे कीटक तांदळाकडे आकर्षित होत नाही. तांदूळ खरेदी केल्यानंतर तांदळाच्या एका छोट्या पिशवीमध्ये थोडं हिंग घाला. तज्ञांच्या मते, असं केल्यास किड्यांबरोबर त्यातील इतर जीवाणूही मरतात.
- लाल मिरची: तांदूळ किंवा धान्याच्या प्रत्येक थरामध्ये 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या ठेवल्यास धान्य सुरक्षित राहिल. वाळवलेल्या लाल मिरच्या धान्यांना अळ्या लागू देत नाही. हा उपाय केल्यास तांदूळ, डाळ किंवा गव्हांमध्ये एकही अळी किंवा किडा दिसणार नाही.
- कडूलिंबाची पानं: बरेच लोक तांदूळ साठवून ठेवताना त्यात कडूलिंबाची पानं घालतात. कडूलिंबाच्या पानांमधील कीटकनाशक गुणधर्म तांदूळामध्ये कीटकांना प्रवेश करण्यापासून रोखतात. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम कडुलिबांची पानं कोरडी करून घ्या. किंवा तुम्ही कडुलिंबाच्या पानांपासून तयार केलेल्या पावडरचे लहान गोळे तयार करुन ते तांदूळात ठेवू शकता. यामुळे पांढऱ्या अड्या होत नाही.
- लसूण पाकळ्या: तांदूळ किंवा इतर धान्यांमध्ये लसणाचा पाकळ्या घातल्यास कीटक दूर राहतात. लसणाच्या सुगंधामुळे तांदूळ दीर्घकाळ चांगला राहातो. हा एक चांगला आणि सोपा उपाय आहे.
- तमालपत्र: स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा तमालपत्र धान्यांना किडे लागण्यापासून दूर ठेवतो. त्याच्या सुगंधामुळे किडे पळू लागतात. ते धान्यांमध्ये राहू शकत नाही. तुम्ही देखील तांदूळ किवा इतर धान्याचं संरक्षण करण्यासाठी तमालपत्राचा वापर करू शकता.
- काळे मिरे: एका कापडात काळे मिरे बांधून घ्या आणि हे तांदूळ किंवा इतर धान्याच्या डब्ब्यात ठेवा. यामुळे कीटक लागत नाही.