मुंबई - हरहुन्नरी अभिनेता म्हणून अन्नूकपूर आपल्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातून उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच एएनआयशी झालेल्या एका मुलाखतीत त्यानं आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. अनेक विषयावर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी त्याला शशी कपूरबरोबर झालेल्या वादाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला. 1984 मध्ये शशी कपूर निर्मित आणि गिरीश कर्नाड दिग्दर्शित 'उत्सव' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.
एएनआयशी एका खास संभाषणात, अन्नूकपूरनं नेमके कशामुळे मतभेद झाले आणि शशी कपूर त्याच्यावर नाराज का झाले याबद्दल सांगितलं. शंकर नाग, शशी कपूर, रेखा, अमजद खान, अनुराधा पटेल, शेखर सुमन, अनुपम खेर, नीना गुप्ता, कुलभूषण खरबंदा, अन्नू कपूर, संजना कपूर आणि कुणाल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'उत्सव'चे शूटिंगच्या आठवणीही सांगितल्या.
शशी कपूर यांच्याशी नेमका काय वाद झाला होता याबद्दल बोलताना अन्नू कपूर म्हणाला, "आम्ही भरतपूरच्या एका टुरिस्ट लॉजमध्ये पत्ते खेळत होतो. अनुपम खेर, शेखर सुमन, दिवंगत सतीश कौशिक हे सर्व माझ्या खोलीत बसले होते. आणि बाकीचे सगळे मोठे स्टार्स दुसऱ्या लॉजमध्ये होते. बाकीचे म्हणाले अरे चहापाणी तरी सांग, पनीर पकोडेही मागव. मी वेटरला बोलवलं आणि ऑर्डर दिली. वेटरनं माझ्याकडे आधी पैसे देण्याची मागणी केली. मी म्हटलं की या वेटरशी काय वाद घालायचा, त्यापेक्षा मी पैसे देऊन टाकले. आमचे प्रॉडक्शनवाले एक बंगाली दादा होते त्यांनी मी म्हटलं की, पैसे द्यायचे असतात हे आम्हाला सांगून ठेवलं असतं तर बरं झालं असतं. असं असेल तर आम्ही स्वतः तिकीटही काढून येत जाऊ. ही गोष्ट त्या बंगाली दादानं शशी कपूरना सांगितली. त्यांनी ही गोष्ट गोविंद निहालानींना सांगितली. गोविंद निहलानी मला म्हणाले की तू शशी कपूर यांना नाराज केलंस, प्रॉडक्शनशी वाद घातलास. मी म्हटलं, वाद नाही घातला मी फक्त माझी बाजू मांडली."
अन्नुनं किस्सा पुढे सांगितला, "त्यानंतर जेव्हा बंगळुरूमध्ये शूटिंग होतं तेव्हा माझं काम संपलं आणि मी निघालो होतो. त्यावेळी शशी कपूर यांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले की तू चाललायसं तर संजनाच्या ( शशी कपूर यांची मुलगी ) या तिकीटावर प्रवास कर. त्याकाळात कुणाच्याही तिकीटावर प्रवास केला तरी प्रॉब्लेम नसायचा. ते आत गेले आणि त्यांनी मला पाकिटातून सात हजार रुपये देऊ केले. मी त्यांचे पाय धरले आणि भावूक झालो. मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्या भरतपूर लॉजच्या वेटरला ओळखत नाही पण मला ओळखता. तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर रस्त्यावरच्या ठेल्यावर गेलो असतो पण प्रॉडक्शनचा खर्च होऊ दिला नसता. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे ते विसरुन जा."
"शशी कपूर खूप महान व्यक्ती होते. मला माझ्या 42 वर्षाच्या कारकिर्दीत जे सर्वात उत्तम निर्माता मिळाले ते शशी कपूर होते. जेव्हा तुम्ही फार मोठे नसता तेव्हा तुमचा निर्माता योग्य मोबदला सन्मानं देतो ते शशी कपूर होते त्यामुळे ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. दोन तीन निर्माते मला चांगले भेटले त्यात शशी कपूर हे एक नंबरवर आहेत.", असं अन्नूकपूरनं सांगितलं.
अन्नू कपूर यानं 'मंडी', 'उत्सव', 'मि. भारत', 'तेजाब', 'राम लखन', 'घायल', 'हम', 'डर', 'सरदार', 'ओम जय जगदीश', 'ऐतराज' आणि '7 खून माफ', यासह अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यानं 'अंताक्षरी' हा लोकप्रिय गायन कार्यक्रमही होस्ट केला होता.