मुंबई - बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर एक वेब सीरिज बनणार आहे. जानी फायर फॉक्स फिल्म प्रॉडक्शन हाऊसने 'लॉरेन्स - अ गँगस्टर स्टोरी' नावाची नवीन वेब सिरीज रिलीज करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. या सिरीजला इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने अधिकृतपणे शीर्षक दिले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकावणे यांसारख्या वादांसाठी प्रसिद्ध असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जीवनावर ही वेब सिरीज बनवली जणार आहे.
फर्स्ट लुक कधी रिलीज होणार?
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे. दिवाळीनंतर वेब सीरिजमध्ये गँगस्टरची भूमिका साकारणाऱ्या नायकाचे नाव आणि या मालिकेचा फर्स्ट लूक रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. जानी फायर फॉक्स हे प्रॉडक्शन हाऊस सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाते. लॉरेन्स बिश्नोईभोवती एक मनोरंजक आणि सत्यकथा सादर करणे हा त्याचा उद्देश आहे. दिवाळीला हे पोस्टर रिलीज होणार असून, गँगस्टारची भूमिका कोण साकारत आहे हेही समोर येणार आहे.
जानी फायर फॉक्सने याआधीही सत्य घटनांनी प्रेरित असलेल्या काही कथांवर काम केले आहे. याआधी, प्रोडक्शन हाऊसने 'ए टेलर मर्डर स्टोरी' बनवली होती जी उदयपूर टेलर कन्हैयालाल साहूच्या हत्येवर आधारित आहे. याशिवाय 'कराची टू नोएडा' देखील बनवले आहे ज्यामध्ये सीमा हैदर आणि सचिनची अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
अलीकडेच महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती, ज्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. त्यानंतर त्याने धमकी दिली की जो कोणी सलमान खानला मदत करेल त्याला सोडणार नाही. याशिवाय काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता ज्याची जबाबदारीही बिश्नोई टोळीने घेतली होती. तर सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकसाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.