मुंबई - अभिनेता विक्रांत मॅसीनं अलीकडेच अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. विक्रांतच्या या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटादरम्यान विक्रांतनं अभिनयातून विश्रांती घेण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयाचा वेगळा अर्थ लावण्यात आला. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी काही काळ अभिनयाला विश्रांती देण्याचा तो विचार करत होता. मात्र तो अभिनयातून कायमचा बाजूला जाणार असल्याच्या अफवा पसरल्या. नंतर त्यानं याचा खुलासा करुन आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगितलं होतं.
विक्रांत पुन्हा कधीपासून काम करणार या अपडेटकडेसाठी आतुर असलेल्या त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ वाटत होतं. विक्रांत किती काळ कामापासून दूर राहणार याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. आता विक्रांत शनाया कपूरसोबत डेहराडूनमध्ये शूटिंगवर दिसला आहे. त्यामुळे आपला आवडता स्टार परत आल्यानं विक्रांतचे चाहते आनंदी झाले आहेत. विक्रांत आता शनाया कपूरबरोबर 'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटात दिसणार आहे.
'आँखों की गुस्ताखियां' हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीजसाठी सज्ज होत आहे. जेव्हा चाहत्यांनी विक्रांतला डेहराडूनमध्ये पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विक्रांत मॅसी यानं त्याच्या संपूर्ण टीमसह मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. यावेळी विक्रांतनं काळ्या रंगाचे जॅकेट आणि आइसवॉश जीन्स घातलेली दिसली.
'आँखों की गुस्ताखियां' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याची निर्मिती मानसी आणि वरुण बागला यांनी केली आहे. चित्रपटाची कथा निरंजन अय्यंगार आणि मानसी बागला यांनी लिहिली आहे. युवा संगीतकार आणि गायक विशाल मित्रा या चित्रपटाला संगीत देत आहेत. हा चित्रपट लेखक रस्किन बाँडच्या कथेवर आधारित असल्याचं बोललं जात आहे.