कोल्हापूर - सात मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह दहा चित्रपटांच्या कथा आणि पटकथांचं लेखन, निळू फुले, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज मराठी चित्रपट कलावंतांबरोबर काम, सुमारे 150 नाटकांचे संहितालेखन असं एन रेळेकर यांचं मराठी चित्रपट विश्वात मोठं योगदान आहे. मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवणारे नारायण उर्फ एन. रेळेकर उतारवयात मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होते. ज्या हाताने लेखन करून मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली अशा हातांनाच आता आधार नव्हता. सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या तीन हजारांच्या पेन्शनमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या कलासक्त रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेलाय. बुधवारी सकाळी रेळेकर यांनी कोल्हापुरातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं कलानगरी सुन्न झाली आहे.
साठच्या दशकात प्रसिद्ध झालेल्या दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या 'चोरी चोरी' चित्रपटानं अनेकांना वेड लावलं होतं, त्यातीलच एक राज कपूर यांचे चाहते म्हणजे नारायण रेळेकर. 'चोरी चोरी' हा चित्रपट पाहण्यासाठी कोडोली पारगाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातून चालत कोल्हापुरात आले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या हालचालींचे कुतूहल रेळेकर यांना स्वस्त बसू देत नव्हतं. चित्रपटाच्या या वेडामुळेच त्यांनी जन्मगाव सोडून मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीला भालजी (बाबा) पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये पडेल ती कामे करून चित्रपट निर्मिती कशी करतात याचे धडे गिरवले, मात्र निर्मितीपेक्षा दिग्दर्शन आणि लेखनात रस निर्माण झाला आणि यानंतर मराठी चित्रपट सृष्टीला समृद्ध करणाऱ्या अनेक चित्रपटांचे लेखन एन. रेळेकर यांच्या हातून झालं.
एन रेळेकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
झुंज तुझी माझी, टोपीवर टोपी, शांतीने केली क्रांती, धनी कुंकवाचा, तु शेरकारी आम्ही शेतकरी, नवनाथ महात्मे, छंद प्रीतीचा या लोकप्रिय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन एन रेळेकर यांनी केले तर गावरान गंगू, खुर्ची सम्राट या चित्रपटांसाठीही त्यांनी लेखन केलं आहे.
दीडशेहून अधिक नाटकांचे लेखन
आमचा बापच खोटा होता, अहो मी तुमचीच, सौदा, आम्हीच मुख्यमंत्री होणार, बादशहा, आज रात्रीच भेटा, छंद प्रीतीचा या नाटकावर आधारित याच नावाच्या 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात सुबोध भावे आणि शरद पोंक्षे यांनी अभिनय केल्याचे एन रेळेकर सांगतात, तर 40 वर्षाहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीची सेवा केल्यानंतर त्यांना दादासाहेब फिल्म फाउंडेशनचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2016 साली मिळाला आहे.
या दिग्गज कलाकारांसोबत अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम
ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय निळू फुले, श्रीराम लागू, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निशिगंधा वाड, अश्विनी भावे, दीपक देऊळकर यासारख्या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
उतारवयात मात्र जीवनाची वाताहत
चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शन, लेखन, गीतकार, अभिनय अशा सर्व प्रकारात निपुण असलेल्या एन. रेळेकर यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य मात्र संघर्षांनी भरलेले होते. सरकारकडून मिळणाऱ्या तीन हजारांच्या पेन्शनमध्ये दोन मुलांसह उदरनिर्वाह कसा करायचा? भाड्याच्या घरात राहत असल्याने प्रसंगी पोटाची खळगी भरण्यासाठीही आबाळ होत असताना राज्य सरकारनं निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी मागणी जेष्ठ दिग्दर्शक, लेखक एन. रेळेकर यांनी राज्य सरकारकडे केली होती. मराठी चित्रपट सृष्टीचा चालता-बोलता इतिहास असलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्येही लाईट, कॅमेरा, ॲक्शन हा आवाज घुमावा अशी अपेक्षाही रेळेकर यांची होती. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीतील जाणता माणूस गमावल्याच्या भावना कोल्हापुरातील सिनेकलाकारांनी व्यक्त केल्यात.
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीतील एकच जाणकार नाव म्हणून दिग्दर्शक एन रेळेकर यांना राज्यभरात ओळख होती. त्यांच्या हटके स्टाईलने केलेलं लिखान रसिक प्रेक्षकांना भुरळ घालत होतं. कमलाकर तोरणे यांच्या 'आई' चित्रपटासाठी आम्ही दोघांनी सोबत काम केलं, त्यांच्याकडून मिळालेली अनुभवाची शिदोरी लाख मोलाची होती, त्यांच्या जाण्यानं कोल्हापूरच्या सिनेसृष्टीच न भरून येणार नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सिने कॅमेरामन इम्तियाज बारगीर यांनी दिली आहे. एन रेळेकरांना करावा लागलेला उतारवयातील संघर्ष कोणाही चित्रपट कर्मींच्या वाट्याला येऊ नये अशीच भावना या निमित्तानं चित्रपट विश्वातून व्यक्त होत आहे.