नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा सन्मान वाळवी या चित्रपटाला मिळाला आहे. साहिल वैद्य यांचा माहितीपट मर्मर्स ऑफ द जंगलला दोन पुरस्कार मिळाले आहेत. तर उत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार गुलमोहर या चित्रपटाला मिळाला आहे.
वाळवी हा चित्रपट २०२३ साली पडद्यावर आला. परेश मोकाशी यांना हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब- वाळवी चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वप्निल जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटाला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, "पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासारखा देशातला सर्वात मोठा पुरस्कार मिळणं आणि आपण त्या चित्रपटाचा भाग असणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मी जे काही १५-२० सिनेमे केलेत, त्यातला हा पहिला चित्रपट आहे, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. त्यामुळे माझ्यासाठी अजून जास्त स्पेशल आहे. या चित्रपटाबाबत माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची ही बाब होती की, मी माझ्या अत्यंत लाडक्या दिग्दर्शकाबरोबर काम करतोय. मधुगंधा ही माझी मैत्रिण, तिच्या लिखाणाचा मी चाहता आहेच. त्याचबरोबर परेशचा तर डिरेक्टर म्हणून मी फॅन आहे. परेश मोकाशीनं या चित्रपटासाठी मला विचारणं हे माझ्या करियरसाठी खूप महत्वाचं होतं. एक अत्यंत विकृत मानसिकतेचा नवरा साकारायला मिळणं, चित्रपट करताना मी याच आनंदात होतो की मला परेशचा सिनेमा करायला मिळतोय. चित्रपट करताना मला नक्कीच हे जाणवत होतं की काहीतरी वेगळं घडतोय."
प्रेक्षकांचाही ऋणी- परेश मोकाशी यांची 'वाळवी' हा नावीन्यपूर्ण आणि हटके कलीकृती असलेला चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, '' राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो आमच्या संपूर्ण टीमचा आहे. मी प्रेक्षकांचाही तितकाच ऋणी आहे.''
गिरणी कामगारांचे विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याचा आनंद- चित्रपट समीक्षक अशोक राणे यांच्या माहितीपटालाही बर्लिन चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे. 'मोहनजोदडो'च्या निमित्तानं त्यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनीही त्यांच्या भावना ईटीव्ही भारतशी बोलताना मांडल्या. ते म्हणाले, "जे गिरणगाव मी लहानपणापासून पाहिलं. ज्या कामगारांनी हे गिरणगाव वसवलं. महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या कानकोपऱ्यातून आलेले कामगार, कुठल्याही जातीपातीचे धर्माचे ते एकच म्हणायचे. त्यांनी वसवलेलं गाव. हे अतिशय सुंदर गाव होतं. तसंच मोहनजोडदोही एक प्रगत सिव्हिलायझेशन. त्या गावात १९८२ चा संप झाला आणि ते वाईपआऊट झालं, नाहीसं झालं. पण ते गाव किती सुंदर होतं , ते लोकांना दाखवायचं होतं. ते मी दाखवलं. बर्लिनचाही याला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे या गिरणी कामगारांचे विषय देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील याचा मला आनंद होतोय."
- मराठीचा आणखी एक सन्मान या पुरस्कारांच्या निमित्तानं झाला आहे. साहिल वैद्य यांच्या मर्मर्स ऑफ जंगल या माहितीपटाला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याच माहितीपटाला उत्कृष्ट निवेदनाचाही पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटालाही पुरस्कार मिळाला आहे.
- इतरही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार गुलमोहर या चित्रपटाला मिळाला आहे. राहुल चित्तेला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शर्मिला टागोर, मनोज बाजपेयी, सिमरन, सूरज शर्मा अमोल पालेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.