मुंबई - हृतिक रोशन, राकेश रोशन आणि राजेश रोशन यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारी 'द रोशन' ही बहुप्रतिक्षित डॉक्युकेशन-मालिकेच्या रिलीज तारीख जाहीर झाली आहे. हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे वडील राकेश रोशन आणि काका राजेश रोशन यांच्यासमवेतच्या एका नवीन पोस्टरसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
पोस्टरच्या कॅप्शनमध्ये हृतिकनं लिहिलंय, "लाइट्स, कॅमेरा, फॅमिली! संगीत, चित्रपट आणि वारसा परिभाषित करणाऱ्या बाँडद्वारे रोशनच्या जगाची सैर करा. 17 जानेवारीला फक्त नेटफ्लिक्सवर येणारी द रोशन पहा." घोषणा शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी त्यांचा उत्साह शेअर करण्यासाठी कमेंट सेक्शन भरुन टाकलं आहे.
एका चाहत्यानं लिहिलं, "'द रोशनचा वारसा' पाहण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय चित्रपट उद्योगातील महान व्यक्तींवरील प्रेरणादायी माहितीपट पाहण्यासाठी उत्सुक आहोत! 17 जानेवारी ही तारीख नोंद करुन ठेवली आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं की, "या मालिकेत दिवंगत रोशनलाल नागरथ हे आदरणीय संगीत दिग्दर्शक, त्यांचा एक प्रसिद्ध संगीतकार मुलगा राजेश रोशन, चित्रपट निर्माता राकेश रोशन आणि अभिनेता हृतिक रोशन हे केंद्रस्थानी असतील. चित्रपट उद्योगातील तीन पिढ्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील एक घनिष्ठ दृष्टीकोन लोकापर्यंत पोहोचवण्याचं उद्दीष्ठ समोर असेल."
शशी रंजन दिग्दर्शित आणि राकेश रोशनसह सह-निर्मित, या मालिकेत रोशन कुटुंबातील सदस्य आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. यामध्ये रोशनच्या वारशाबद्दल त्यांचे दृष्टिकोन मांडले आहेत. या मालिकेचे सह-निर्माते आणि दिग्दर्शक शशी रंजन यांनी या मालिकेविषयी म्हटलं होतं की, "या मालिकेचे दिग्दर्शन करणे हा माझ्यासाठी एक सन्माननीय प्रवास होता. यानिमित्तानं मला मला रोशन कुटुंबाच्या वारशाशी जोडण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. त्याबद्दल मी रोशन कुटुंबाचा आभारी आहे, रोशन कुटुंबाच्या सर्जनशीलतेची, त्यांच्या धैर्याची आणि बांधिलकीची कथा मी यातून जगाला दाखवणार आहे, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे." हिंदी सिनेमा उद्योगात रोशन कुटुंबाचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. यानिमित्तानं सामान्य प्रेक्षकांना रोशन फॅमिलीतील नातेसंबंध, त्यांनी केलेला संघर्ष, सर्जनशीलता याचा उलगडणार आहे.