भोपाळ - बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त निराधार ठरलं आहे. त्यांच्या केअरटेकरनं पुढं येऊन या अफवांना पूर्णविराम लावला. इंदिरा भादुरी यांच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं, पण आता त्या निरोगी आहेत. त्यांच्यावर भोपाळमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी जया बच्चन आणि नातू अभिषेक बच्चनही त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी मुंबईहून भोपाळला पोहोचले आहेत. जया भादुरी यांची दुसरी मुलगी नीता म्हणाली, "आता तिची प्रकृती ठीक आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत."
अमिताभ बच्चन यांच्या सासूबाईंचे भोपाळमधील श्यामला हिल्सच्या अन्सल अपार्टमेंटमध्ये वास्तव्य
अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई आणि जया बच्चन यांच्या आई भोपाळच्या श्यामला हिल्स येथील अन्सल अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना तीन मुली आहेत. यापैकी जया बच्चन यांचे लग्न अमिताभ बच्चन बरोबर झालं आहे, तर दुसरी मुलगी रीता हिचे लग्न अभिनेता राजीव वर्माशी झालं आहे. इंदिरा भादुरी यांची तिसरी मुलगी नीता असून ती भोपाळमध्ये त्यांच्या घरासमोर राहते. केअरटेकर बबली म्हणाल्या, ""इंदिरा भादुरी यांच्या मणक्यात फ्रॅक्चर झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. ती खात-पीत आहे." असं इंदिरा भादुरी निरोगी असल्याचं केअर टेकरने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
अमिताभ बच्चन यांचे सासरे भोपाळमध्ये होते पत्रकार
इंदिरा भादुरी या बिहारच्या रहिवासी आहेत. लग्नापूर्वी त्यांचे नाव इंदिरा गोस्वामी होते. त्यांचा विवाह भोपाळमधील पत्रकार आणि लेखक तरुण कुमार भादुरी यांच्याशी झाला होता. तरुण कुमार यांनी यापूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम केलं होतं. तरुण यांच्या तीन मुलींमध्ये जया बच्चन सर्वात मोठ्या आहेत. याआधी अभिषेक बच्चन देखील ऐश्वर्यासह भोपाळला आजीला भेटण्यासाठी पोहोचला आहे.
९४ वर्षांच्या आहेत जया बच्चनच्या आई इंदिरा भादुरी
इंदिरा भादुरी या ९४ वर्षांच्या आहेत. त्यांचे पती तरुणकुमार भादुरी यांचं १९९६ मध्ये निधन झालं. अभिषेक बच्चनही त्याची आजी इंदिरा यांच्या खूप जवळचा आहे. आजीला भेटायला तो अनेकदा भोपाळला येतो. त्यामुळेच इंदिरा भादुरीची तब्येत बिघडल्याची बातमी कुटुंबीयांना मिळताच जया बच्चन आणि अभिषेक बच्चन मुंबईहून भोपाळला पोहोचले.
जया बच्चनचं मध्य प्रदेशशी घट्ट नातं
जया बच्चन यांचे मध्य प्रदेशशी घट्ट नातं आहे. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी जबलपूर येथे झाला. पुढे त्यांचे कुटुंब भोपाळला स्थायिक झालं. चित्रपटात करिअर करण्यासाठी जया मुंबईत आली. सध्या जया बच्चन यांची आई भोपाळच्या श्यामला हिल्स येथील अन्सल अपार्टमेंटमध्ये राहते. 3 जून 1973 रोजी जया बच्चन यांचे भोपाळमध्ये चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झालं होतं.