चेन्नई- Thalapathy Vijay : तमिळ मेगास्टार 'थलापथी' विजय हा आता चर्चेत आला आहे. त्यानं राजकारणात प्रवेश केला आहे. विजयनं आपल्या राजकीय पक्षाचा झेंडा लॉन्च केला आहे. पणयुर येथील पक्ष कार्यालयात आज सकाळी पक्षाचा ध्वज आणि राष्ट्रगीत परिचय सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विजयची आई शोबा आणि वडील चंद्रशेखर यांच्यासह 300 हून अधिक लोक उपस्थित होते. विजय 2026ची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या ॲक्शन थ्रिलर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT)नंतर तो चित्रपटसृष्टीतून निवृत्त होणार असल्याचं त्यानं यापूर्वी जाहीर केलय.
'तमिलगा वेत्री कझगम' ध्वज : विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या पक्षाचा ध्वज हा लाल आणि पिवळ्या रंगाचा असून याच्या मध्यभागी 'वागाई'चं फूल आहे. ध्वजाच्या दोन्ही बाजूला युद्ध हत्ती आहेत. तसंच खालच्या बाजूला लाल रंगाचा आडवा पट्टा असून मध्यभागी पिवळा एक पट्टा आहे, यामध्ये ध्वजाचं मुख्य चिन्ह आहे. हा ध्वज खूपच आकर्षक आहे. आपल्या पक्षाच्या ध्वजाचं आणि चिन्हाचं अनावरण करताना विजयनं पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह नेत्यांबरोबर शपथ घेतली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये, विजयनं 'तमिलगा वेत्री कझगम' पक्ष लॉन्च करण्याची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना थक्क केलं होतं.
तामिळनाडूचं राजकारण : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयच्या पक्षानं कोणत्याही राजकीय गटाला पाठिंबा दिला नाही. विजयच्या राजकारणातील प्रवेशामुळे तामिळनाडूतील सध्याचं राजकारण नक्कीच बदलेल. विजयच्या, फॅन क्लब 'विजय मक्कल इय्याकम'चे दहा लाख सदस्य आहेत. विजयसाठी पुढील आव्हानं हे खूप महत्त्वचं असेल, राजकीय क्षेत्रात, विजयचा पक्ष 'तमिलगा वेत्री कझगम' (TVK),ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)या द्रविडीयन पक्षांशी स्पर्धा करेल. हे दोन्ही पक्ष तामिळनाडूच्या राजकारणावर सध्या राज्य करत आहेत. याशिवाय तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) देखील आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तामिळनाडूच्या राजकारणात पूर्वीपासूनच अनेक स्टार्स दिसून येतात. यात जयललिता, शिवाजी गणेशन, के. करुणानिधी, रजनीकांत, कमल हासन, एम.जी. रामचंद्रन विजयकांत यासह इतरही कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा :