मुंबई : प्रसिद्ध तमिळ अभिनेता 'दिल्ली' गणेश यांचं काल रात्री उशिरा राहत्या घरी आजारपणामुळे निधन झालंय. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'दिल्ली' गणेश यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. गणेश यांचा मुलगा महादेवननं मीडियाला सांगितलं की. "माझे वडील आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री जेव्हा आम्ही त्यांना गोळी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली." 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता 'दिल्ली' गणेश यांचं निधन झाल्याचं कुटुंबीयांनी निवेदनात सांगितलं आहे.
तामिळ अभिनेता 'दिल्ली' गणेशचं निधन : 'दिल्ली' गणेश यांनी 3 दशके तमिळ चित्रपटसृष्टीत काम केलंय. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. बालचंदर लिखित 'पट्टिना प्रवेशम ' या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती, हा चित्रपट 1976 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. यानंतर बालचंदर यांनी गणेश यांना, 'दिल्ली गणेश' असं नाव देऊन त्यांचे कौतुक देखील केलं होत. कारण त्यांनी दिल्लीतील एका नाट्यमंडळात काम करून अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडली होती. याशिवाय त्यांनी भारतीय हवाई दलातही सेवा बजावली आहे. त्याचा शेवटचा चित्रपट कमल हासनबरोबरचा 'इंडियन 2' होता.
'या' प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं : 3 दशकांच्या कारकिर्दीत गणेश यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांचे अपूर्व सगोधरार्गल, नायकन, माइकल मदाना काम राजन, सिंधु भैरवी, तेनाली, यांसारख्या चित्रपट गाजले आहेत. 'दिल्ली' गणेश यांनी तमिळ व्यतिरिक्त मल्याळम, तेलुगू आणि हिंदीमध्येही काम केलंय. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे. 1994 मध्ये त्यांना तामिळनाडू सरकारनं कलईमामणि पुरस्कार दिला. मिळालेल्या माहितीनुसार गणेश यांचा अंतिम संस्कार 10 नोव्हेंबर म्हणजेच आज होणार आहेत. दरम्यान 'दिल्ली' गणेश यांचा जन्म 1944 मध्ये झाला. चित्रपटांव्यतिरिक्त गणेश यांनी टीव्ही मालिका आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलंय. 'दिल्ली' गणेश यांचं खरं नाव गणेशन होतं, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांच्या निधनानं आता साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय त्यांचे चाहते देखील त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे दु:खी झाले आहेत.