मुंबई - लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शनबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या कामाक्षीपल्य पोलिसांनी हत्येप्रकरणी अभिनेता दर्शनला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रदुर्गाच्या रेणुकास्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शनला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या तपासात एका आरोपीनं साऊथ सुपरस्टार दर्शनचं नाव घेतलं असून, त्याशिवाय त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. दर्शन याच्यावर आरोपीच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी माहिती दिली की, "9 जून रोजी बेंगळुरू पश्चिम विभागातील कामाक्षिपाल्य पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या हत्येप्रकरणी, कन्नड चित्रपट उद्योगातील एक अभिनेता दर्शन याला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. तपास केला असता, चित्रदुर्गाचे रहिवासी रेणुकास्वामी (३३) हे पीडितेचे नाव असून, याप्रकरणी सुमारे १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे."
कोण होते रेणुकास्वामी?
9 जून रोजी एक अनोळखी मृतदेह सापडला होता. मृतदेहावरील जखमा पाहून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तांत्रिक बाबींच्या आधारे मृतांचा तपशील गोळा करण्यात आला. चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी (३३) असे मृताचे नाव आहे. तो एका मेडिकल दुकानात काम करत असल्याची माहिती आहे. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. या दरम्यान, रेणुकास्वामी याचे चित्रदुर्ग येथून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा मृतदेह शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षिपल्य येथे आढळून आला, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस आता हे प्रकरण गांभीर्याने हाताळत आहेत. तपासादरम्यान, अभिनेता आणि त्याच्या साथीदारांसह 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. खून झालेला व्यक्ती एका अभिनेत्रीला अश्लील कमेंट करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे दयानंद यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away