मुंबई - थिएटरमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या भूमिका असलेला "स्त्री 2" चित्रपट आता OTT वर आपला प्रवास सुरू करणार आहे. प्राइम व्हिडिओने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केल्यानं 'स्त्री 2' ची वाट पाहणाऱ्या ओटीटी प्रेक्षकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. स्त्री 2 आता 10 ऑक्टोबरपासून ओटीटीवर झळकणार आहे.
मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक निर्माते दिनेश विजन यांनी आपली उत्कंठा शेअर करताना म्हटलं की, "स्त्री 2: सरकटे का आतंक हा आमच्यासाठी खरोखरच खास चित्रपट आहे. सशक्त आणि आवडती पात्रे आणि चांगली कथा ही प्रेरक शक्ती असू शकते याचा हा पुरावा आहे. या चित्रपटाच्या यशाने आणि कलाकारांना मिळालेल्या प्रेमाने आम्ही खरोखरच नम्र झालो आहोत."
"स्त्री 2: सरकटे का आतंक'ने आपल्या दमदार कथाकथनामुळे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं आपल्या स्टाईलमध्ये मजबूत स्थान निर्माण केलं आहे. प्रभावी कलाकार, पाय-टॅपिंग संगीत, जबरदस्त फोटोग्राफी आणि आनंदी आणि रोमांचक क्षणांसह, चित्रपटानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.
'स्त्री 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटाला आता थिएटरमध्ये 43 दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाच्या 42 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज समोर आला आहे. सहाव्या बुधवारी चित्रपटाने अंदाजे 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाने 42 दिवसांत अंदाजे 581.40 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी ओटीटी पदार्पणाची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते. आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.