मुंबई - Vikas Sethi Death : प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचं रविवारी 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 48 व्या वर्षी अचानक निधन झालं. त्याच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 'कभी खुशी कभी गम'मधील करीना कपूर खानच्या मित्राची भूमिका साकारून विकास प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार विकासचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला. त्याची पत्नी जान्हवी सेठीनं सोशल मीडियावर त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आज सोमवारी 9 सप्टेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार त्याच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आला.
विकास सेठीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार : जान्हवी सेठीची आता एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, "अत्यंत दुःखानं, आम्ही तुम्हाला आमच्या लाडक्या विकास सेठीच्या निधनाबद्दल कळवत आहोत, जो 8 सप्टेंबर 2024 रोजी आम्हाला सर्वांना सोडून गेला. 9 सप्टेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील." रिपोर्ट्सनुसार, विकास आणि जान्हवी एका फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते. या दरम्यान त्याचे पोट दुखत होते. यानंतर त्याला उलट्या झाल्या. त्याच्या पत्नीनं खुलासा केला की, त्याला रुग्णालयात जायचं नव्हतं, म्हणून त्यानं डॉक्टरांना घरी येण्यास सांगितलं. एका संवादादरम्यान त्याच्या पत्नीनं म्हटलं, "जेव्हा मी सकाळी 6च्या सुमारास त्याला उठवायला गेले, तेव्हा त्याच्यात जीव नव्हता. रात्री झोपेत हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं."
'या' स्टार्सनं लावली हजेरी : विकासला शेवटाचा निरोप देण्यासाठी अभिनेता शब्बीर अहलुवालिया, हितेन तेजवानी, शरद केलकर आणि दीपक तिजोरी यांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. विकासची शेवटीची इंस्टाग्रामवरील पोस्ट 17 आठवड्या पूर्वीची आहे. यात त्यानं मदर्स डेच्या निमित्तानं आपल्या आईबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. दरम्यान विकासचं पार्थिव मुंबईतील कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं होतं. विकास हा टेलिव्हिजनचा एक प्रसिद्ध चेहरा होता. त्यानं एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मध्ये सहाय्यक भूमिका साकारली होती. याशिवाय तो 'कसौटी जिंदगी की' सारख्या शोचा भाग राहिला आहे. त्याच्या निधनामुळे टीव्ही जगतात दुःखाचं वातावरण आहे.