मुंबई : अलीकडेच, प्रसिद्ध फिल्म इंडस्ट्रीमधील कोरिओग्राफर रेमो आणि लिझेल डिसूझा यांनी डान्स ग्रुपबरोबर फसवणूक केल्याची बातमी समोर आली होती. आता याप्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रेमो आणि लिझेलनं रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलंय. यामध्ये त्यांनी फसवणुकीचा आरोप फेटाळला असून प्रकरण काय आहे हे स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असंही सांगितलं की, त्यांना याप्रकरणाची माहिती बातमी वाचल्यानंतर मिळाली, ज्यानंतर ते स्वतःही आश्चर्यचकित झाले. रेमो आणि लिझेल डिसूझा यांनी या डान्स ग्रुपची 11.96 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं बातमीमध्ये सांगण्यात आलं होतं.
रेमो डिसूझानं आरोप फेटाळले : रेमो आणि त्याच्या पत्नीनं आरोपांबद्दल निराशा व्यक्त करत इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिलं, 'मीडिया रिपोर्ट्सद्वारे आम्हाला कळले आहे की एका डान्स ग्रुपनं माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करत तक्रारी दाखल केली आहे.' याशिवाय त्यानं पुढं लिहिलं, 'हे जाणून मला खूप वाईट वाटलं, अशी माहिती प्रकाशित होणं खूपच निराशाजनक आहे. आम्ही सर्वांना विनंती करू इच्छितो की, खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यापूर्वी अफवा पसरवणे टाळावे. आम्ही योग्य वेळी आमच्या केसचा पाठपुरावा करणार आहोत. आम्ही आतापर्यंत केलेल्या प्रत्येक शक्य मार्गानं अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत . आम्ही आमचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या प्रेमासाठी आणि सतत समर्थनासाठी आभार मानू इच्छितो. या सर्व अफवा आहेत, त्यात तथ्य नाही. लिझेल आणि रेमो.'
रेमो डिसूझाचं फसवणूक प्रकरण : बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध 26 वर्षीय डान्सरच्या तक्रारीच्या आधारे आणि इतर पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 465 (षडयंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 16 ऑक्टोबर रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात आयपीसी, 420 (फसवणूक) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रेमो आणि त्याची पत्नी हे दोघेही चर्चेत आले होते. आता सोशल मीडियावर रेमो आणि त्याच्या पत्नीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण पाठिंबा देताना दिसत आहेत.