नवी दिल्ली - पाकिस्तानी चित्रपटांना भारतात प्रदर्शन करणं खूप अडचणींचं बनलंय. या पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा समावेश असलेला 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होत नसल्यामुळं अनेकांच्या पदरात निराशा पडली आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट एका दशकाहून अधिक काळानंतर भारतात प्रदर्शित होणारा पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरणार होता. परंतु भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनाला 2019 पासून पाकिस्तानमध्ये बंदी घातली असल्याचा फटका या चित्रपटाला बसला आहे.
'द लीजेंड ऑफ मौला जट' हा 'मौला जट' या क्लासिक पाकिस्तानी चित्रपटाचा आधुनिक रिमेक आहे. यामध्ये हमजा अली अब्बासी यांनी साकारलेला नूरी नट्ट आणि स्थानिक नायक मौला जट यांच्यातील वैराची थरारक कथा केंद्र स्थानी आहे. चित्रपटाची सशक्त कथा आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी असतानाही भारतातील राजकीय पक्ष विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्याकडून होत असलेला विरोध यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही.
मनसे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला आहे. एका न्यूजवायरला दिलेल्या निवेदनात त्यांनी जाहीर केलं की, "आम्ही भारतात कोणत्याही पाकिस्तानी चित्रपटाला किंवा कलाकाराला एन्टरटेन्मेंट करणार नाही," असं म्हणत त्यांनी नागरिकांना त्यांच्या या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही आणि असे झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाकिस्तानी चित्रपटांना विरोध करण्यामध्ये मनसेची भूमिका काही प्रश्नांसह आहे. "आपले सैनिक सीमेवर मारले जात असताना इथे पाकिस्तानी कलाकारांची गरज का आहे? आपल्याकडे पुरेशी प्रतिभा नाही का?" असे प्रश्न अमेय खोपकर यांनी व्यक्त केले आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात आणण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती आणि हे निर्बंध उठवण्यासाठी कायदेशीर आव्हाने असतानाही, सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये या संबंधीची याचिका फेटाळून लावली. फवाद खान आणि माहिरा खान या दोघांनीही यापूर्वी भारतीय सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. 'ए दिल है मुश्कील' आणि 'खूबसूरत' मध्ये फवाद यानं काम केलंय, तर माहिराने 'रईस' मध्ये शाहरुख खान बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.