मुंबई - 'सिंघम अगेन' हा चित्रपट दीपिका पदुकोणसाठी कायमस्वरुपी खास असणार आहे. कारण या चित्रपटात तिनं गरोदर असताना पती रणवीर सिंगबरोबर काम केलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी रणवीर सिंग म्हणाला की, 'सिंघम अगेन' हा त्याच्या मुलीचा पदार्पणाचा चित्रपट आहे. त्यानं आपल्या बाळाचा उल्लेख 'बेबी सिम्बा' असा केला आहे.
"दीपिका बाळामध्ये पूर्ण गुंतली आहे, त्यामुळं फक्त मीच येऊ शकलो. माझी बाळासाठीची ड्यूटी रात्रीची आहे. या चित्रपटात तुम्हाला सर्व स्टार्स बरोबर आमचा 'बेबी सिम्बा' सुद्धा पदार्पण करताना दिसेल कारण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दीपिका गरोदर होती." असं रणवीर म्हणाला. रणवीरनं त्याच्या कुटुंबियांच्या वतीनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"मी तुम्हा सर्वांना लेडी सिंघम आणि बेबी सिम्बा यांच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळीत तुमच्या कुटुंबासह चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा आनंद घ्या," असं तो पुढे म्हणाला, त्यावेळी प्रेक्षकांनी जारदारपणे जल्लोष केला.
दीपिका आणि रणवीर सिंग या स्टार जोडप्याला 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. ही बातमी त्यांनी अधिकृत इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना कळवली होती. त्यावेळी त्यांनी "स्वागत आहे बेबी गर्ल! ८.९.२०२४," असे लिहिले होते.
रणवीर आणि दीपिका या स्टार जोडप्याशिवाय, 'सिंघम अगेन' या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपटात करीना कपूर खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार आहेत. चित्रपटाच्या या नेत्रदीपक ट्रेलरमध्ये 'सिंघम अगेन'च्या कलाकारांची एकत्रित झलक पाहायला मिळते. यामध्ये काही प्रसंगी रामायणाचा संदर्भही दिला गेला आहे. आधुनिक काळात अडचणीत सापडलेल्या सीतामाईची सुटका करण्यासाठी बाजीराव सिंघम प्राणाची बाजी लावताना या चित्रपटात दिसणार आहे.
'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत खलनायक अर्जुन कपूर विरुद्ध सामना करताना दिसत आहे. हा चित्रपट 'गुड व्हर्सेस एविल' या थीममध्ये गुंफलेला आहे. चित्रपटात, करीना कपूरनं अजयच्या पत्नीची भूमिका केली आहे, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार सिम्बा आणि सूर्यवंशी यांच्या भूमिकेत आहेत.
कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम' म्हणून झळकली आहे. टायगर श्रॉफनेही एसीपी सत्य पट्टनायक म्हणून सिंघमच्या टीममध्ये प्रवेश केला आहे. 'सिंघम अगेन' या दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याची बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'शी टक्कर होणार आहे.