मुंबई - Ranbir Kapoor learning Archery : नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे. त्याच्या भूमिकेसाठी अनेक नव्या गोष्टी तो आत्मसात करत आहे. ही व्यक्तीरेखा वास्तववादी व्हावी यासाठी त्यानं जोरदार तयारी सुरू केली आहे. अलीकडील सोशल मीडिया पोस्ट्सने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. यासाठी तो तिरंदाजीचं कठोर प्रशिक्षण घेत असल्याचा खुलासा केला आहे.
'रामायण' चित्रपटाच्या पूर्व निर्मितीवर आजपर्यंत काम सुरू होतं. आता या कलाकारांच्यावर पूर्ण फोकस स्थिरावला असून साई पल्लवी यामध्ये सीताची भूमिका करणार आहे. तर 'केजीएफ' स्टार यश यामध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूर या चित्रपटाची तयारी करत असतानाची एक झलक ऑनलाइन समोर आली आहे. यामध्ये त्याचे समर्पण दिसून आले आहे. त्याच्या प्रशिक्षकाने रणबीर कपूर रामाच्या भूमिकेसाठी धनुर्विद्या शिकत असल्याचा खुलासा पोस्टच्या कॅप्शनमध्ये केला आहे.
भगवान रामाच्या छबी धनुर्धारी राम अशीच लोकांच्या मनात आहे. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नितेश तिवारी करत आहे. त्यामुळे या शस्त्र चालवण्याच्या विद्येमध्ये रणबीर पारंगत असावा, याची काळजी घेतली जात आहे. 'रामायणा'तील अनेक प्रसंगात रामाला हे धनुष्य बाणाचे शस्त्र चालवावे लागणार आहे. या पूर्वी 'आदिपुरुष' चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली होती. मात्र भारतीय पौराणिक कथेला न्याय मिळाला नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली होती. त्यामुळे मोठ्या बजेटसह बनलेल्या या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नव्हता.
पुढील वर्षी दिवाळीपूर्वी 'रामायण' चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, या महत्त्वकांक्षी चित्रपटाकडे तमाम सिनेरसिकांसह भारतीयांचं लक्ष असणार आहे. यामधील सोज्वळ भूमिकेमुळे रणबीर कपूरच्या प्रतिष्ठेत भरच पडणार आहे. अलिकडे त्यानं 'अॅनिमल' चित्रपटात एका रागीट व्यक्तीची भूमिका साकारली होती. नेमकी या उलट ही आव्हानात्मक भूमिका त्याला साकारायची आहे. कामाच्या आघाडीवर रणबीर आगामी 'लव्ह अँड वॉर' या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -