मुंबई - तुम्ही जर 'पंचायत' मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे 'पंचायत 4' च्या शूटिंगला सुरुावतही झाली आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओनं एक फोटो पोस्ट शेअर करुन ही बातमी दिली आहे.
'पंचायत 4' च्या निर्मात्यांनी मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जितेंद्र कुमार पुन्हा एकदा सचिवजी म्हणून फुलेरा गावात दाखल झाला असून मालिकेतील इतर पात्रंही त्याच्या दिमतीला सज्ज झाली आहेत.
'पंचायत' ही मालिका टीव्हीएफ (The Viral Fever - TVF) या बॅनरनं बनवली होती. खरंतर हा बॅनर क्लासिक वेब सिरीज बनवण्यासाठी ओळखला जातो. पंचायतच्या पहिल्या सीझनपासून देशभरातील तरुणांना आकर्षित करण्यात निर्माते यशस्वी झाले होते. 'पंचायत सीझन 4' चे लेखन चंदन कुमार यांचं असून दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.
या मालिकेत जितेंद्र कुमार प्रिय सचिवजीच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच रघुबीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, फैसल मलिक, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मूळ कलाकारांबरोबरच चौथ्या सीझनमध्ये काही नवीन पात्रं सामील होणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात तिसरा सीझन ओटीटीवर रिलीज झाला होता.
पंचायत मालिकेचं कथानक - 'पंचायत' मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर पंचायत मालिकेत एक तरुण एस्पिरन्ट तात्पुरती सोय म्हणून पंचायतीचा सचिव म्हणून 'फुलेरा' या खेड्यात रुजू होतो. गावातले राजकारण, इथल्या लोकांची सुखं दुःखं यात तो रमून जातो. आपली कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या अडथळ्यांचा तो सामना करतो आणि यासाठी त्याला प्रामाणिक गावकऱ्यांची साथही मिळते. गाव खेडी आधुनिक होत असताना त्यात तयार होणारी स्थित्यंतर खूप जवळून पाहण्याची संधी ही मालिका तयार करुन देत आली आहे. यामध्ये रंजक कथा तर आहेच पण यातील पात्रं खरीखुरी वाटावीत इतकी प्रमाणिक आहेत. पंचायतच्या चौथ्या सीझनची सुरुवात तिसरा भाग जिथं संपला तिथून सुरू होणार आहे.