मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रमुख राजकीय पक्ष मतदारांना आपल्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. यासाठी संपूर्ण देशातून स्टार प्रचारकांच्या सभांचं आयोजन झालं आहे. दरम्यान, मतदारांना आपला हक्क बजावण्याचं आवाहन करण्यासाठी कलाकारांनीही कंबर कसली आहे. यासाठी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रेयस तळपदे यांनी मुंबईतील सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रचार सायकल रॅलीमध्ये लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. श्रेयसनं प्रत्येक मताचे महत्त्व सांगून जनतेला लोकशाहीच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी होण्याची विनंती केली.
याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "आपल्या राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मी प्रत्येकाला त्यांच्या वेळेतून 10 मिनिटे काढून मतदान करण्याचे आवाहन करतो. जर कोणाला 'हम फूल नहीं आग हैं, हमारी उंगली में सत्ता है' असे वाटत असेल तर त्यासाठी तुमच्या बोटांचा वापर करा."
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिनंही जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केलं. ती म्हणाली, "मी सर्वांना विनंती करते की 20 नोव्हेंबरला या आणि मतदान करा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा आहे."
मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सायकलस्वारांनी रॅलीत भाग घेतला आणि लोकांना त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्याचे आवाहन केलं. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 सदस्यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 81 जागांच्या झारखंड विधानसभेसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.