मुंबई - हिंदी चित्रपटाचा ज्येष्ठ अभिनेता आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूकचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झालं. गेल्या काही दिवासापासून ती आजारी होती असं समजतं. हेलेना गेल्या अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहत होती आणि तिथेच तिनं अखेरचा श्वास घेतला. हेलेना ल्युकचा मृत्यू अमेरिकेत झाल्याची बातमी प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी तिनं अखेरचा श्वास घेतल्याचं यात म्हटलं आहे.
अभिनेत्री सारिकाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती मॉडेल-अभिनेत्री हेलेना ल्यूकला भेटला. असं म्हटलं जातं की दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेलेनाची भुरळ मिथुनसारख्या वेगानं लोकप्रिय होत असलेल्या कालाकारावर पडल्यामुळं सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. एकापोठोपाठ यश मिळत असल्यामुळं त्यावेळी मिथुन करिअरच्या शिखरावर होता. मात्र, १९७९ मध्ये झालेला हा विवाह फार काळ टिकला नाही. एक वर्षही न टिकलेला हा संसार केवळ 4 महिन्यात विस्कटला. असं म्हटलं जाते की लग्नाच्या 4 महिन्यांनंतर हेलेनानं घटस्फोट घेतला आणि मिथुननं योगिता बालीशी लग्न केलं. त्यानंतर मिथुननं पुन्हा हेलेनाची कधीच विचारपूस करण्याचा प्रयत्न केला नाही.
हेलेना हिनं अभिनयाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द गाजवण्याचा प्रयत्न केला. 'आओ प्यार करें', 'दो गुलाब' आणि 'साथ साथ' या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. हेलेनाने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'मर्द' या चित्रपटातही काम केलं होतं. यामध्ये तिने ब्रिटीश राणीची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. परंतु, नंतर तिनं चित्रपट विश्व सोडलं आणि ती न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली. या ठिकाणी ती डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. मिथुनपासून वेगळे झाल्यानंतर हेलेनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे चार महिन्यांचे लग्न आता एक अंधुक स्वप्न बनलं आहे. मिथुननं माझं ब्रेनवॉश केलं होतं आणि मला विश्वास दिला होता की आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. पण हे फार काळ टिकू शकले नाही, असं तिनं म्हटलं होतं