मुंबई - Manoj Jarange Patil biopic : गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारणात एका अराजकीय माणसाचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ते तहानभूक विसरून प्रशासनाशी आणि महाराष्ट्र शासनासोबत लढत आहेत. त्यांना लाखो मराठ्यांचा पाठिंबा असून सध्या जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. एक मराठा, लाख मराठा म्हणत त्यांनी धडक मोर्चे काढले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन, उपोषणे करून आरक्षणाची मागणी लावून धरली आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तुफान पाठिंबा मिळत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या समाजासाठी अविरत आणि अविश्रांत झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा 'संघर्षयोद्धा' हा चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावरील बायोपिक असलेल्या 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा बनला आहे. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी हा चित्रपट चित्रित झाला असून तो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली असून शिवाजी दोलताडे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. लेखनाची जबाबदारी गोवर्धन दोलताडे यांनी उचलली असून त्यांनी चित्रपटाची निर्मितीही केली आहे. पटकथा आणि संवाद लेखन सुधीर निकम यांनी केले आहे.
या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशी तगड्या कलाकारांची टीम आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील बायोपिक येत्या २६ एप्रिल २०२४ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा -