मुंबई - Maharaja Movie : निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित 'महाराजा' तमिळ ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, हा गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. 'महाराजा'मध्ये विजय सेतुपतीनं मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले आहे. विजय सेतुपतीचा हा 50 वा चित्रपट आहे. 'महाराजा'नं रुपेरी पडद्यावर 100 कोटींहून अधिक कमाई केली असून चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटगृहांनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
'महाराजा' होणार नेटफ्लिक्सवर रिलीज : दरम्यान चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवर 'महाराजा' 12 जुलै 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सनं या चित्रपटाचे डिजिटल अधिकार मोठ्या रकमेत विकत घेतल्याचं बातमी देखील आता समोर आली आहे. अधिकृत घोषणा करताना नेटफ्लिक्सनं लिहिलं की, "महाराजा' चित्रपट 12 जुलै रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करेल." या चित्रपटाची स्टारकास्टही अप्रतिम आहे. 'महाराजा'मध्ये विजय सेतुपती व्यतिरिक्त मल्याळम स्टार ममता मोहनदाससह बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील मुख्य भूमिकेत आहेत.
विजय सेतुपतीचे आगामी चित्रपट : या चित्रपटात अनुराग कश्यपनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'महाराजा' हा अनुराग कश्यपचा तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यानं 'इमाइका नोडिगल' आणि दिग्दर्शक लोकेश कनागराजच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'लिओ' मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान या चित्रपटात विजय सेतुपतीनं महाराजा नावाच्या नाभीकची भूमिका साकारली आहे. 'महाराजा' चित्रपटाची कहाणी खूप थरारक आहे. दरम्यान विजय सेतुपतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात कतरिना कैफबरोबर दिसला होता. पुढं तो 'ट्रेन', 'गांधी टॉक्स' आणि 'इदम पोरुल इवल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.