फरीदाबाद (हरियाणा) - अभिनेता आमिर खानची प्रमुख भऊमिका असलेल्या स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक 'दंगल' मधून 2016 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सुहानी भटनागरच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला दुःख झाले. सुहानीवर दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे डर्माटोमायोसिटिस या दुर्मिळ त्रासदायक आजारावर उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी डाव्या हाताला सूज आल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसू लागली होती, असे सुहानीच्या आईने सांगितले. अनेक डॉक्टरांनी आजाराचे निदान ठरवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ते करू शकले नाहीत. त्यानंतर तिला एम्समध्ये दाखल करण्यात आले.
रविवारी एएनआयशी बोलताना सुहानीची आई पूजा भटनागर यांनी तिच्या आजारपणाबद्दल अनेक खुलासे केले. आमिर खान सुहानाच्या आजारपणादरम्यान कुटुंबाच्या संपर्कात होता. सुहानाला आनंदी ठेवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अलिकडेच आमिरची मुलगी आयरा खानचा विवाह पार पडला, त्यावेळी त्याने सुहानीच्या कुटुंबालाही लग्नाचे आमंत्रण दिसले होते.
याबद्दल बोलताना सुहानाची आई म्हणाली, "आमिर सर नेहमी तिच्या संपर्कात राहिले. तो एक चांगला माणूस आहे. आम्ही आधीच त्यांना तिच्या आजाराची माहिती दिली नाही कारण आम्ही आधीच खूप अस्वस्थ होतो. आम्ही ते आमच्यापुरतेच ठेवले आणि कोणालाही सांगितले नाही. आम्ही जर त्यांना एखदा मेसेजही पाठवला असता तरी त्यांनी आमच्याकडे लगेच विचारपूस केली असती. सुहानीला जेव्हापासून आमिर सर ओळखत होते तेव्हापासून ते तिच्याशी जोडले गेले होते. आम्हाला अलिकडेच त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देखील मिळाले होते. त्यांनी आम्हाला फोन करुनही लग्नाला येण्यासाठी कळवले होते ,” असे दिवंगत अभिनेत्री सुहानीच्या आईने सांगितले.
आयरा खानच्या लग्नाला सुहानी भटनागरचे कुटुंबीय हजर राहू शकले नाही. याकाळातच ती त्यावेळी फ्रॅक्चरमधून बरी झाली होती आणि प्रवास करू शकत नव्हती. मुलीच्या आजाराबद्दल अधिक तपशील शेअर करताना, सुहानीची आई म्हणाली, "इंडस्ट्रीमध्ये आम्हाला जी काही ओळख मिळाली ती सुहानीमुळेच. ती एक हुशार मुलगी होती आणि तिने जे काही केले त्यात तिला उत्कृष्ट बनवायचे होते. मात्र, नंतर तिची स्वप्ने भंग पावली. तिच्या हातावर सूज आली होती. आम्हाला सुरुवातीला वाटले की हा फक्त त्वचेचा आजार आहे. आम्ही तिला काही त्वचारोग तज्ञांकडे नेले पण काहीही फायदा झाला नाही. एकदा आम्ही तिला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल केल्यावर तिला डर्माटोमायोसायटिस झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचारादरम्यान, तिला संसर्ग झाला आणि तिच्या शरीरात द्रव तयार होऊ लागले होते, ज्यामुळे तिची फुफ्फुसे निकामी होत गेली आणि तिचा मृत्यू झाला."
शनिवारी सुहानीच्या अकाली निधनाची बातमी मिळाल्यानंतर, आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या एक्स हँडलवर एक मनापासून नोट लिहिली. "आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दु:ख झाले आहे. तिची आई पूजाजी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आमच्या मनःपूर्वक सहवेदना आहेत. अशी प्रतिभावान तरुण मुलगी, अशी एक टीम प्लेअर, दंगल सुहानीशिवाय अपूर्ण राहिले असते. सुहानी, तू नेहमीच आनंदी राहशील. आमच्या हृदयात एक तारा होऊन राहा. तुला शांती लाभो," असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
'दंगल' हा चित्रपट 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर स्मॅश-हिट ठरला. मुख्य भूमिकेत आमीर खान असलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर घोषित झाला आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटात सुहानीने बबिताची लहानपणीची भूमिका साकारली होती, तर सान्या मल्होत्राने मोठी बबिता फोगटची भूमिका केली. जायरा वसीमने गीता फोगटच्या बालपणीची भूमिका वाठवली होती तर फातिमा सना शेखने मोठ्या गीता फोगटची भूमिका साकारली.
हेही वाचा -