मुंबई - Rakul Jackky Wedding : बॉलिवूड कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या जोडप्याने परदेशात डेस्टिनेशन वेडिंगची योजना आखली होती, मात्र रकुल-जॅकीच्या लग्नाच्या संबंधी सुरू असलेल्या चर्चातून नवीन माहिती उघड होत आहे. त्यांनी परदेशात जाऊन बोहल्यावर चढण्याचा बेत रद्द केला आहे आणि त्याऐवजी ते भारतातच लग्न करणार आहेत.
जवळपास तीन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी अखेर विवाहाच्या प्रवासाला सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात पती पत्नी म्हणून शपथ घेईल. असे असले तरी लेटेस्ट अपडेट्सवरून त्यांच्या लग्नाच्या गोष्टीत आणखी एक ट्विस्ट दिसून येतो तो म्हणजे, त्यांनी मूळतः परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करायचे ठरवले असताना ऐनवेळी भारतात लग्न करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला?
माहितीनुसार, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा दोन दिवस चालेल आणि 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात त्यांचा विवाह संपन्न होईल. सुरुवातीला परदेशात भव्य उत्सव साजरा करण्यासाठी, या जोडप्याने जवळजवळ सहा महिन्यांपासून प्रत्येक तपशीलाची काळजीपूर्वक योजना आखली होती. त्यानुसार पाहुण्यांची यादीही बनवली होती. मात्र डिसेंबर महिन्यात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत कुटुंबांनी देशाच्या सीमेतच भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले, तेव्हा दोघांनीही आपला निर्णय बदलला.
राष्ट्रीय अभिमान आणि आर्थिक योगदानाच्या भावनेने घेतलेल्या या निर्णयासाठी या भव्य सोहळ्याच्या आयोजनात बरेच बदल करणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी नव्या दमाने तयारीला सुरुवात केली आहे. गोव्यात पार पडणारा हा विवाह सोहळा नेत्रदीपक असणार आहे.
कामाच्या आघाडीवर, जॅकी भगनानी सध्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सारख्या स्टार्ससोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' सारख्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात गुंतला आहे. दरम्यान, रकुल प्रीत तमिळ, तेलुगु, हिंदी आणि बहुभाषिक सिनेमांमध्ये काम करत आहे. यामध्ये 'इंडियन 2' आणि 'आयलान' सारख्या बहुप्रतीक्षित चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा -