मुंबई Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं (SGPC) चित्रपटाच्या निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवली असून आता याबद्दल मोठा वाद पाहायला मिळत आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर हटवण्याची मागणी केली आहे. कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी'चा ट्रेलर 14 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. एसजीपीसीचे सचिव प्रताप सिंग यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच सेन्सॉर बोर्डाला चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेक तक्रार पत्रे पाठवली आहेत.
'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात : प्रताप सिंग यांनी कंगना राणौतवर शीखांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शीखविरोधी दृश्यांनी भरलेला आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा प्रताप यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात सीडीपीसी आणि अकाल तख्त यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटावर तातडीनं बंदी घालण्याची मागणी केली होती. सीडीपीसी आणि अकाल तख्तनेही ट्रेलरवर आक्षेप घेतला होता. एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी पत्रकार परिषद घेऊन कंगना राणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं, अनेक चित्रपटांमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, मात्र आम्ही आता 'इमर्जन्सी'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सेन्सॉर बोर्ड पक्षपात करत असल्याचं ठरवत त्यांनी हल्लाबोल केला असून यामध्ये शीख समुदायातील लोकांना समाविष्ट करण्याबाबतही त्यांनी म्हटलं.
शीख समाजाच्या भावना दुखावल्या : अकाल तख्तचे अध्यक्ष ग्यानी रघबीर सिंग यांनी दावा केला आहे की, "इमर्जन्सी' या चित्रपटात जाणूनबुजून शीख समाजाचे चुकीचे चित्रण तयार करण्यात आले आहे, हा एक कारस्थान आहे. 'इमर्जन्सी' चित्रपट संपूर्ण समाजाची अवहेलना करत आहे. कंगना हे सर्व जाणूनबुजून करत आहेत." त्यांनी पुढं म्हटलं, "1984 मध्ये शीख समुदायावर झालेला अत्याचार आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि आता कंगना रणौतचा चित्रपट जरनाल सिंग खालसा भिंद्रनवालेच्या व्यक्तिरेखेला खलनायक ठरवून टाकत आहे. जरनाल सिंग खालसा भिंद्रनवाले यांना शीख समुदायानं हुतात्मा घोषीत केलंय."
कंगनाची 'इमर्जन्सी' चित्रपटामधील भूमिका : 'इमर्जन्सी' चित्रपटाची घोषणा कंगनानं 2021मध्ये केली होती. हा फक्त इंदिरा गांधींचा बायोपिक नाही, असंही कंगनानं सांगितलं होतं. 'इमर्जन्सी'मध्ये कंगना ही देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत, अनुप खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'इमर्जन्सी' हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :