मुंबई - Jagat Bhari Pandharichi Wari : पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. विठ्ठलाचं सावळं रूप पाहण्यासाठी भक्त आतुर असतात. चातकाप्रमाणे ते वारीची वाट पाहतात. आता आषाढी वारी जवळ आली आहे. महाराष्ट्राला वारीची मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. वारीचे परंपरा आणि इतिहास मोठा आहे. याच वारीची माहिती गाण्याच्या माध्यमातून साध्या, सोप्या आणि सरळ शब्दात उलगडत हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठक यांनी 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय, भक्तिमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांच्या भेटीसाठी आणलं आहे.
वारीचा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा...
'जगात भारी पंढरीची वारी' हे गाणं गीतकार गुरू ठाकूरनं शब्दबद्ध केलं आहे. तर मनीष राजगिरे यांचा आर्त स्वर या गाण्याला लाभला असून, विजय गवंडे यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. यावेळी बोलताना संदीप पाठक म्हणाला की, "मी प्रत्येक वर्षी वारीत सहभागी होतो. वारीतील आनंद जगात कुठेच नाही. खरं सांगतो, खरा आनंद केवळ इथेच मिळतो. तसेच मला ही वारी नवी नसली तरी दरवेळी तिचा नवा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असतो. दरम्यान, ज्यांना प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन वारीचा अनुभव घेता येत नाही, त्यांच्यासाठी घरबसल्या वारीचा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि नव्या पिढीला वारीची ओळख करून देण्यासाठी 'जगात भारी पंढरीची वारी' या कार्यक्रमाच्या आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारीची माहिती देण्याचं काम करत आहे." आपण विठू-रखमाईच्या चरणी आपल्या कलेच्या माध्यमातून भक्तीची तुळशीमाळ अर्पण करत असल्याची संदीपची भावना आहे.
वारीचे ‘डॉक्युमन्टेशन’ व्हावे...
आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचं माहितीपटाच्या स्वरूपात ‘डॉक्युमन्टेशन’ करता येईल. वारीचं अशा प्रकारचं ‘डॉक्युमन्टेशन’ व्हावं, तसंच ‘ऑडिओ व्हिजुअल’ स्वरूपात ते असावं आपली इच्छा असल्याची भावना संदीप पाठकने बोलून दाखवली. 'जगात भारी पंढरीची वारी' हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आषाढी वारीच्या पूर्वतयारीला जोर येतोय. या निमित्तानं विठ्ठलाचा, पांडुरंगाचा गजर सर्वत्र होत आहे. हा हरिनामाचा गजर आणि भगवंतभेटीची अनिवार ओढ लागलेल्या विठ्ठलभक्तांना पंढरीच्या मायबापाच्या दरबारात नेण्याचा आनंद 'जगात भारी पंढरीची वारी' हे गाणं देईल, असा विश्वासही संदीपनं व्यक्त केला.
हेही वाचा -