मुंबई - Hrithik Roshan and Mahesh Babu: बॉलिवूडचे प्रसिद्ध माजी जोडपे हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा मुलगा रेहानने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्याच्या आई वडिलांना खूप अभिमान वाटत आहे. सुझैनने तिच्या नवीन इंस्टाग्राम रीलवर पदवीदान कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दुसरीकडे, साऊथ स्टार महेश बाबूच्या मुलानेही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हिनं सोशल मीडियावर मुलाच्या ग्रॅज्युएशनचे फोटो शेअर करत मुलाबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.
मुलाच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याला हृतिक-सुझैन आले एकत्र
2014 मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान वेगळे झाले. पण त्यांच्या मुलांसाठी ते नेहमी एकत्र आलेले दिसले आहेत. अलीकडेच हे जोडपं त्यांचा मोठा मुलगा रेहानच्या ग्रॅज्युएशन डेसाठी एकत्र आले होते. त्यांचा धाकटा मुलगा हृदयनही यावेळी त्यांच्या बरोबर होता. दोघांनीही मुलाबद्दलचा अभिमान बाळगत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून आता ते व्हायरल झाले आहेत. फोटो शेअर करताना सुझैनने लिहिले, "आम्ही पुढे कुठे जाणार आहोत हे कोणालाच माहीत नाही, पण मी इतकं जरुर सांगेन की आम्ही योग्य मार्गावरुन चाललो आहोत. माझ्या मुलाचे अभिनंदन.. मी तुझ्याकडून रोज शिकते, खूप अभिमान आहे."
नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर शेअर केले मुलाचे फोटो
महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरनेही त्यांच्या मुलाच्या पदवीचे फोटो शेअर केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, "माझ्या प्रिय मुला, तू तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहेस. मला तुझा किती अभिमान वाटतो हे तुला कळावं अशी माझी इच्छा आहे. स्वतःशी खरा राहा, तुझी आवड जप आणि स्वप्नं कधीही विसरू नकोस. मी तुझ्यावर जितका विश्वास ठेवते तितका स्वतःवर विश्वास ठेव आणि लक्षात घे की आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी माझं प्रेम आणि पाठिंबा नेहमी तुझ्याबरोबर असेल. तुझ्या या खास दिवसाबद्दल खूप खूप अभिनंदन. हे जग तुझं आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते."
हेही वाचा -