मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग झालेलं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवरही सादर केलं जाणार आहे. यासाठी निर्माता परितोष पेंटर, सेजल दीपक पेंटर, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी पुढाकार घेतला आहे. परितोष पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन प्रयोग रविवार १५ डिसेंबरला दुपारी २.३० वा. आणि सायं.५.३० वा. पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात सादर होणार आहेत.
प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचं हिंदी रूपांतर करण्यात आलं आहे. यातील नथुराम गोडसेची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शत अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांबरोबर भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दीपक पेंटर यांनी सांभाळली आहे.
जे अमराठी प्रेक्षक आहेत त्यांनाही महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे जाणून घेता येईल. ‘गांधीजींना मानणारा ते त्यांचा मारेकरी’ असा नथुराम गोडसेचा प्रवास या नाटकाच्या निमित्तानं उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भूमिका प्रस्तुतकर्ते परितोष पेंटर आणि लेखक, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी मांडली.
प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे दोन अंकी नाटक गोपाळ गोडसे लिखित 'मे इट प्लीज यू ऑनर' या पुस्तकावर आधारित आहे. या नाटकातून गोडसेची बाजू मांडण्यात आली आहे. यापूर्वी नव्वदच्या दशकात निर्माता उदय धुरत यांच्या 'माऊली प्रॉडक्शन' ने 'मी नथुराम गोडसे बोलतोय' मराठी रंगभूमीवर आणलं होतं. वादग्रस्त विषय, दिग्गज दिग्दर्शक दिवंगत विनय आपटे यांचं कल्पक दिग्दर्शन आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद पोंक्षेचा कसदार अभिनय यामुळे मराठी रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं. काही महिन्यांपूर्वी शरद पोंक्षेने याच विषयावरचं नाटक वेगळ्या टीमबरोबर रंगभूमीवर आणल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. मराठीत या नाटकाचे प्रयोग अक्षरशः पोलीस सुरक्षेत झाले आहेत. काही विचारवंतांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली असली तरी विचार स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात घेऊन या नाटकाला प्रेक्षकांनीही आधार दिला आहे. आता याच नाटकावर बेतलेलं ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ हा हिंदीत होणारा प्रयोग नाट्यरसिक, विचारवंत स्वीकारतात की हे नव्या वादाला आमंत्रण ठरतं, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.